
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांची मैत्री जगजाहीर आहे. आता ट्रम्प त्यांच्या या अत्यंत जवळच्या सहकाऱ्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी नवी कोरी टेस्ला कार खरेदी करणार आहेत. एकूणच काय तर, ‘मस्क यांच्यासाठी कायपण’ असेच म्हणावे लागेल. अमेरिकेतील काही गटांनी इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. त्यांना प्रत्युत्तर म्हणून खुद्द ट्रम्प उद्या, बुधवारी सकाळी एक नवीन टेस्ला खरेदी करणार आहेत. त्यांनी टथ सोशलवरील पोस्टमधून ही माहिती दिली.
ट्रम्प म्हणाले की, सर्व महान अमेरिकन लोकांसाठी आणि आपल्या देशाच्या हितासाठी एलॉन मस्क सर्व काही पणाला लावत आहेत. ते एक उत्तम काम करत आहेत, मात्र काही कट्टरपंथी डाव्या विचारसरणीचे लोक बेकायदेशीरपणे जगातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या टेस्लावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मस्क यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीची हानी करायची आहे, पण खऱ्या अमेरिकन महान मस्क यांच्यावर माझा विश्वास आहे. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मी नवीन टेस्ला कार खरेदी करणार आहे.