तिसरं महायुद्ध फार दूर नाही! ट्रम्प यांचं मोठं विधान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठं विधान करून खळबळ उडवली आहे. मियामी येथे एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी ‘तिसरे महायुद्ध फार दूर नाही’ असं विधान करत इशारा दिला आहे. मात्र त्याचवेळी आपलं नेतृत्त्व हे महायुद्ध रोखण्याची क्षमता राखतं असा दावाही त्यांनी केला आहे.

तसेच ट्रम्प म्हणाले की जर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं प्रशासन पुन्हा सत्तेत आलं असतं तर तिसरं महायुद्ध अटळ होतं.

‘तिसरं महायुद्ध होणं कोणाच्याही फायद्याचं नाही आणि तुम्ही त्यापासून फार दूर नाहीत. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, तुम्ही फार दूर नाहीत. जर आपल्याकडे हे (बायडेन) प्रशासन आणखी एक वर्ष असते तर तुम्ही तिसऱ्या युद्धात असता मात्र आता ते होणार नाही’, असं ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प म्हणाले की अमेरिका यापैकी कोणत्याही युद्धात भाग घेणार नसली तरी ते महायुद्ध रोखेल.

‘आम्ही लोकांना या मूर्खपणाच्या आणि कधीही न संपणाऱ्या युद्धांपासून रोखणार आहोत. आम्ही स्वतः त्यात सहभागी होणार नाही. परंतु, आम्ही कोणापेक्षाही अधिक मजबूत आणि ताकदवान असू. आणि जर कधी युद्ध झालेच तर कोणीही आमच्या जवळ येऊ शकणार नाही, परंतु आम्हाला वाटत नाही की असं कधी घडेल’, असं ते म्हणाले.

ट्रम्प यांनी X वरील एका पोस्टमध्ये एलॉन मस्क यांचं विधान कोट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटले की, ‘एलोन मस्क: युक्रेनबाबत राष्ट्राध्यक्षांचे विचार अगदी बरोबर आहेत. या निरर्थक युद्धात इतक्या पालकांनी त्यांची मुलं आणि मुलांनी त्यांचे पालक गमावले आहेत, हे खरोखर दुःखद आहे’.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्यावर निशाणा साधला आणि म्हटले की अमेरिकेने युरोपपेक्षा 200 अब्ज डॉलर्स जास्त खर्च केले आहेत, तर युरोपचे आर्थिक योगदान म्हणजे केवळ ‘हमी’ आहे आणि अमेरिकेला कोणत्याही परतावा मिळत नाही.

जे युद्ध आपण (युक्रेन) जिंकू शकणार असा विश्वास असूनही झेलेन्स्की यांनी अमेरिकेला अशा युद्धात अब्जावधी डॉलर्स गुंतवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. शस्त्रास्रांचे वाटप आणि युरोपच्या समान आर्थिक योगदानाच्या अभावावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. झेलेन्स्की म्हणजे एकप्रकारचे हुकूमशहा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.