
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर रेसिप्रोकल टॅरिफ अर्थात परस्पर शुल्क जगभरातत लागू केले आहे. ट्रम्प यांनी 2 एप्रिल हा दिवस अमेरिकेसाठी ‘लिबरेशन डे’ म्हणजे ‘मुक्ती दिवस’ असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेला पुन्हा एकदा श्रीमंत बनवण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमधील रोझ गार्डनमध्ये संबोधित करताना कोणत्या देशावर किती टक्के टॅरिफ लावण्यात आला याची माहिती दिली. ट्रम्प यांनी हिंदुस्थानसह जगभरातील अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लावला आहे. विशेष म्हणजे एकीकडे ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्र संबोधत दुसरीकडे हिंदुस्थानवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली.
हा ‘मुक्ती दिवस’ असून ज्याची आम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. 2 एप्रिल 2025 हा अमेरिकी उद्योगांना पुनर्जन्म देणारा, अमेरिकेचे भाग्य बदलणारा आणि अमेरिकेला पुन्हा समृद्ध बनवणारा दिवस मानला जाईल, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत हिंदुस्थानवर किती टक्के टॅरिफ लावणार याचीही माहिती दिली.
US President Donald Trump imposes 26% “reciprocal tariffs” on India, followed by 34% on China, 20% on EU, and 24% on Japan pic.twitter.com/0uhLSCKSOV
— ANI (@ANI) April 2, 2025
हिंदुस्थानचे पंतप्रधान नुकतेच अमेरिकेमध्ये आले होते. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. पण ते मित्र असले तरी अमेरिकेला योग्य वागणूक देत नाही, असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानने अमेरिकेवर लादलेल्या टॅरिफचे वर्णन ‘कठोर’ या शब्दात केले. हिंदुस्थान अमेरिकन उत्पादनांवर 52 टक्के आकारतो, त्यामुळे अमेरिकाही हिंदुस्थानवर निम्मा अर्थात 26 टक्के टॅरिफ आकारेल, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली. दरम्यान, 9 एप्रिल 2025 पासून हे शुल्क लागू होणार असून हिंदुस्थानातून निर्यात होणाऱ्या ऑटो पार्टस, इलेक्ट्रॉनिक्स आणि कापडाच्या व्यापारावर याचा परिणाम होऊ शकतो.
कोणत्या देशावर किती रेसिप्रोकल टॅरिफ?
हिंदुस्थान – 26 टक्के
चीन – 34 टक्के
युरोपियन युनियन – 20 टक्के
जपान – 24 टक्के
तैवान – 22 टक्के
इस्रायल – 17 टक्के
व्यापार युद्धाची भीती
दरम्यान, रेसिप्रोकल टॅरिफमुळे दोन देशांमध्ये व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर होईल. तसेच याचा प्रभाव शेअर मार्केटवरही पडण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा करताच जपानचे मार्केट 2.65 टक्के, हॉन्गकॉन्गचे मार्केट 1.04 टक्के कोसळले. गुरुवारी हिंदुस्थानच्या शेअर मार्केटवरही याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.