अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने लैंगिक शोषणप्रकरणी दोषी ठरवले आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दिलेला 50 लाख डॉलर्स भरपाई देण्याचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे ट्रम्प महिनाभराने अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतरदेखील त्यांच्याविरोधात हा खटला न्यायालयात सुरूच राहणार आहे. त्यामुळे फेडरल कोर्टाचा निर्णय म्हणजे ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 1997 साली दिलेल्या एका निकालानुसार एखाद्या व्यक्तीला तो राष्ट्राध्यक्षपदी आहे म्हणून गुह्यांच्या खटल्यांपासून संरक्षण मिळणार नाही. त्यामुळे 20 जानेवारी 2025 पासून डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ सुरू होत असून त्यानंतरही हा खटला न्यायालयात चालणार आहे.
नेमके प्रकरण काय?
डोनाल्ड ट्रम्प यांनी 90 च्या दशकात न्यूयॉर्कच्या एका स्टोअरमधील ड्रेसिंग रूममध्ये मॅगेझिन पत्रकार ई जीन कॅरोल यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. याप्रकरणी ट्रम्प यांच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. न्यायालयाने ट्रम्प यांना दोषी ठरवून 50 लाख अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावला. याविरोधात ट्रम्प यांनी मॅनहॅटन येथील सर्किट कोर्ट ऑफ अपीलमध्ये नव्याने सुनावणी घेण्याची विनंती करत याचिका दाखल केली, परंतु या प्रकरणात समोर आलेले पुरावे हे ट्रम्प दोषी असल्याचे स्पष्ट करत असल्याचे नमूद करत न्यायालयाने आधी दिलेला निकाल कायम ठेवला आहे.
यापूर्वीही 83.3 मिलियन डॉलर्सचा दंड
ट्रम्प यांना यापूर्वीही जानेवारी 2024 मध्ये कॅरोल यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दुसऱ्या एका खटल्यात न्यायालयाने तब्बल 83.3 मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावला. या निकालाविरोधात ट्रम्प याचिका दाखल करणार असल्याचे वृत्त आहे. मी कॅरोलला कधीच भेटलो नाही आणि ती माझ्या टाईपची नाही, असे विधान ट्रम्प यांनी कॅरोल यांचे आरोप फेटाळताना केले होते.
रेकॉर्डेड पुरावे ग्राह्य
ट्रम्प यांच्याविरोधात कॅरोल यांनी दिलेला जबाब आणि बहुचर्चित अॅक्सेस हॉलीवूड टेपमधील ट्रम्प यांचा रेकॉर्डेड आवाज या गोष्टी ट्रम्प यांच्याविरोधात न्यायालयात सादर करण्यात आल्या. हे सर्व पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने ट्रम्प यांना दोषी ठरवले आणि 50 लाख डॉलर्सचा दंड ठोठावला. त्यात 20 लाख डॉलर्स हे लैंगिक शोषणाचा दंड म्हणून तर 30 लाख डॉलर्स हे 2022 मध्ये ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमधून केलेल्या मानहानीची भरपाई म्हणून दिले जाणार.