झेलेन्स्कींना रशियाविरुद्ध युरोपचा पाठिंबा, लंडनमधील आपत्कालीन बैठकीत 27 नेते करणार चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये खडाजंगी झाली. दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. या वादविवादानंतर झेलेन्स्की आपल्या सुरक्षा हमीच्या मुद्दय़ांवर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता रशियाविरोधात युरोपने झेलेन्स्कींना पाठिंबा जाहीर केला आहे. झेलेन्स्की यांनी अमेरिकेतून थेट लंडनमध्ये जाऊन ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांची भेट घेतली.

स्टार्मर यांनी युक्रेनच्या समर्थनार्थ युरोपियन नेत्यांची तातडीची बैठक बोलावली असून जर्मनी, फ्रान्स, इटलीसह तब्बल 27 देशांचे नेते बैठकीत सहभागी होणार आहेत. युद्धविराम करारावर बैठकीत चर्चा होणार असून याबाबतचा आराखडा अमेरिकेला सादर करण्यात येणार आहे. ट्रम्प यांना दोन्ही देशांकडून शांतता कराराला मान्यता मिळावी असे वाटत आहे, यावर आपला विश्वास असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर म्हणाले, परंतु अमेरिकेने युक्रेनला सुरक्षेची हमी द्यावी, असेही ते म्हणाले. दरम्यान, ट्रम्प म्हणाले युक्रेन कोणत्याही परिस्थितीत रशियाविरुद्ध युद्ध जिंपू शकणार नाही, परंतु झेलेन्स्की युद्धाचा आग्रह धरत आहेत आणि मला युद्ध संपवायचे आहे आणि शांतता प्रस्थापित करायची आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

रशिया हल्लेखोर, युक्रेन पीडित

ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या भेटीनंतर युक्रेनचे युरोपातील भागीदार आणि जगभरातील नेत्यांनी युक्रेनच्या समर्थनार्थ ‘एक्स’वरून प्रतिक्रिया नोंदवल्या. रशिया हल्लेखोर देश असून युक्रेन पीडित असल्याचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. आम्ही गेल्या तीन वर्षांपासून युक्रेनला मदत करत आलो आहोत. तसेच रशियावर जी बंधने लादण्यात आले आहेत ते योग्यच आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेयेन यांनीही युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. झेलेन्स्की तुम्ही एकटे नाहीत, अशा शब्दांत लेयेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या सध्या हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आहेत.