ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचा फेरआढावा; अध्यक्ष जो बायडेन यांनी दिले निर्देश

अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी चार महिने उरलेले असताना माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. भर प्रचार सभेत हा हल्ला करण्यात आल्याने अमेरिका प्रचंड हादरली. या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेकडे जगभरातून बोट दाखवले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेतील संपूर्ण राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था किती सतर्क आहे याचा फेरआढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

पेनसिल्वेनिया येथील बटलर येथे निवडणूक प्रचारसभेत डोनाल्ड ट्रम्प बोलण्यासाठी उभे राहिले असतानाच 400 फूट अंतरावरून असॉल्ट रायफलमधून 20 वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रुक्स याने पाच गोळ्या झाडल्या. एक डोळी डोक्याजवळून तर एक गोळी कानाला चाटून गेली.  ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात सिक्रेट सर्व्हीसच्या स्नायपर्सनी क्रुक्सला तत्काळ टिपले आणि ठार केले. इंचभर अंतरावर ट्रम्प यांनी मृत्यू पाहिला. हल्लेखोर 400 फुटांवर होता, परंतु त्याच्याबद्दल सिक्रेट सर्व्हीसच्या सुरक्षा रक्षकांना कसे कळले नाही, असा सवाल आता केला जात आहे.

फलकाकडे मान वळवली आणि ट्रम्प वाचले

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गोळीबारातून अगदी थोडक्यात बचावले. प्रचारसभेत ट्रम्प अमेरिकेत अवैध स्थलांतरीतांचा मुद्दा जोरदारपणे मांडत होते. यासाठी मागे लावलेल्या फलकाकडे त्यांनी वाकून बघितले आणि तेवढय़ात हल्लेखोराने एकापाठोपाठ पाच गोळय़ा झाडल्या. गोळी कानाला चाटून गेली. मान आपण मागे वळवली नसती तर गोळी डोक्यात घुसली असती. आपला मृत्यू झाला असता, असे ट्रम्प यांनी सांगितले.

बनावट नोटा छापणाऱयांना पकडण्यासाठी सिक्रेट सर्व्हीस 

1860च्या दशकात अमेरिका बनावट नोटा छापणाऱयांमुळे प्रचंड त्रस्त होती. बनावट नोटा छापणाऱयांचे रॅकेट शोधून काढण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी विशेष तपास संस्था उभारण्याचा आदेश दिला. या तपास संस्थेचे नाव सिक्रेट सर्व्हीस असे ठेवण्यात आले.

1865मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही तपास संस्था  अर्थ मंत्रालयाशी निगडीत गैरव्यवहार रोखण्याचे काम करत होती. परंतु 6 सप्टेंबर 1901 रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष मॅककिन्ले बफेलो यांच्यावर लियोन जोलगोज नावाच्या व्यक्तीने  गोळ्या झाडल्या. एक गोळी पोटात लागली.

8 दिवसांनंतर 14 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अब्राहम लिंकन आणि जेम्स गार्फील्ड यांच्यानंतर मॅककिन्ले हे हत्या होणारे तिसरे अध्यक्ष होते. त्यानंतर पहिल्यांदा यूएस सिक्रेट सर्व्हीसला अध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली.