‘हिंदुस्थानी वाईट असतात’ म्हणत अमेरिकेत 66 वर्षीय नर्सवर रुग्णाचा हल्ला; चेहरा विद्रुप केला, दृष्टी जाण्याचा धोका

अमेरिकेमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानी वंशाच्या विद्यार्थ्यांवर एकामागोमाग हल्ले होत असल्याचे उघड झाले होते. आता हे लोण रुग्णालयापर्यंत पोहोचले असून फ्लोरिडामध्ये 33 वर्षीय अमेरिकेन नागरिकाने हिंदुस्थानी वंशाच्या 66 वर्षीय नर्सवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा चेहरा विद्रुप झाला असून तिच्या तोंडाची हाडं मोडली आहेत. तसेच तिच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी जाण्याचीही शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

लिलम्मा लाल असे जखमी नर्सचे नाव असून स्कॅटलबेरी असे आरोपीचे नाव आहे. वर्ण द्वेषी टिप्पणी आणि हत्येचा प्रयत्न या कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 19 फेब्रुवारी रोजी घडली असून 27 फेब्रुवारी रोजी आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले.

नेमकं काय घडलं?

आरोपीवर फ्लोरिडाच्या पॉल्स वेस्ट साईड रुग्णालयातील सायकॅट्रिक वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. याच रुग्णालयामध्ये लिलम्मा लाल या नर्सचे काम करतात. आरोपी तिसऱ्या मजल्यावरील एका रुममध्ये बेडवर बसलेला होता. लिलम्मा या त्याचे दैनंदिन चेकअप करण्यासाठी गेल्या असता आरोपीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी रुममध्ये आणखी एक व्यक्ती उपस्थित होता. तो मदत मागण्यासाठी बाहेर गेला. रुग्णालयातील इतर व्यक्ती रुममध्ये पोहोचले तेव्हा आरोपी स्कॅटलबरी लिलम्मा यांच्यावर बसून त्यांच्या चेहऱ्यावर गुद्दे मारत होता. हा सर्व प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पिस्तूल दाखवल्यावर आत्मसमर्पण

नर्सवर हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांना तो रस्त्यावर बिना शर्टचा फिरताना सापडला. त्याच्या शरीरावर ईकेजी मशीनच्या ताराही तशाच होत्या. पोलिसांनी पिस्तूल दाखवल्यावर त्याने आत्मसमर्पण केले. हिंदुस्थानी वाईट असतात. मी आताच एका हिंदुस्थानी डॉक्टरला मारहाण केली, असे म्हणत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला कोर्टात हजर केले असता त्याच्या वकिलांनी तो मानसिक आजाराने त्रस्त असल्याचा युक्तीवाद केला.

अमेरिकेत घुसखोरी करण्यासाठी गुजरातचा पटेल बनला पाकचा हुसैन

मेंदूत रक्तस्त्राव, दृष्टी जाण्याचा धोका

दरम्यान, आरोपीच्या हल्ल्यात लिलम्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पीडितेची मुलगी सिंडी जोसेफ हिने आईला गंभीर दुखापत झाल्याचे म्हटले. आईच्या मेंदूत रक्तस्त्रव झाला असून चेहऱ्याच्या उजव्या बाजूची सर्व हाडं तुटली आहेत. तिचे डोळेही सुजले असून दृष्टी जाण्याचा धोका आहे, असेही सिंडी जोसेफ हिने सांगितले. ‘एनडीटीव्ही’ने याबाबत वृत्त दिले आहे.

जॉर्डनची सीमा ओलांडणाऱ्या हिंदुस्थानी व्यक्तीचा सुरक्षा दलाच्या गोळीबारात मृत्यू