पॅलेस्टिनींना आता आफ्रिकेतील गरीब देशांमध्ये वसवणार! अमेरिका, इस्रायलकडून बोलणी सुरू

गाझापट्टी विकत घेऊन तेथील जागेचा पुनर्विकास करण्याचा आणि तेथील नागरिकांचे इतरत्र पुनर्वसन करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला. तेव्हापासून अरब राष्ट्रे आणि अमेरिकेत तणाव निर्माण झाला आहे. अलीकडेच इजिप्तने पॅलेस्टिनींना बाहेर न काढता गाझापट्टीचा विकास करण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता अमेरिका आणि इस्रायलकडून पॅलेस्टिनींना पूर्व आफ्रिकेतील तीन देशांमध्ये वसवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पूर्व आफ्रिकेतील देशांचे राष्ट्राध्यक्ष तसेच उच्चपदस्थ अधिकाऱयांशी बोलणीही सुरू केल्याचे वृत्त आहे.

सुदान, सोमालिया आणि सोमालियातून वेगळय़ा झालेल्या सोमालीलॅण्ड येथे पॅलेस्टिनी नागरिकांना विस्थापित करण्यात येणार आहे, परंतु हे तीनही देश राहण्यासाठी योग्य नसून ते हिंसाचारग्रस्त आणि आर्थिकदृष्टय़ा अतिशय मागासलेले आहेत. त्यामुळे पॅलेस्टिनींचे उत्तर आणि सुंदर क्षेत्रात पुनर्वसन करण्याच्या आश्वासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सुदानने प्रस्ताव फेटाळला, सोमालिया, सोमालीलॅण्डला काहीच माहीत नाही

दुसरीकडे सुदानने ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळला असून सोमालिया आणि सोलामीलॅण्डने आपल्याला याबद्दल काहीच माहित नसून ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी याबाबत संपर्क साधला नसल्याचा दावा असोसिएटेड प्रेसकडे केला. त्यामुळे पॅलेस्टिनी नागरिकांचे काय होणार. हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष आणखी वाढणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

दोन दशलक्ष पॅलेस्टिनींना कायमचे हटवणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनेअंतर्गत गाझातून दोन दशलक्षहून अधिक पॅलेस्टिनींना कायमस्वरूपी हटवण्यात येणार आहे. अमेरिका या क्षेत्राचा पूर्णपणे ताबा घेणार असून येथील मलबा हटवण्यासाठी आणि संपूर्ण परिसर विकसित करण्यासाठी मोठी प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या तीन देशांशीच संपर्क का?

2020 मध्ये सुदानने अब्राहम करारावर स्वाक्षऱया केल्या होत्या. या करारानुसार इस्रायलशी सामान्य राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यात आले होते, मात्र सुदानने ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. सोमालीलॅण्ड तीन दशकांपूर्वी सोमालियाशी वेगळा झाला होता, परंतु या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप मान्यता मिळालेली नाही. सोमालिया अद्यापी सोमालीलॅण्डला आपलाच भाग मानते. सोमालीलॅण्डचे नवे राष्ट्राध्यक्ष अब्दिरहमान मोहम्मद अब्दुल्लाही आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत ट्रम्प यांच्याकडून सोमालीलॅण्डवर पॅलेस्टिनींना त्यांच्या देशात विस्थापित करण्यावर दबाव येऊ शकतो. तर तिसरा देश सोमालियाने गाझावासीयांचे नेहमीच समर्थन केले. त्यांच्या देशात याप्रकरणी निदर्शनेही झाली, परंतु या देशाने ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नसल्याचे म्हटले आहे.