ईव्हीएम हॅक करता येतं, निकालही फिरवता येतो! अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या हाती पुरावे, तुलसी गब्बार्ड यांचा खळबळजनक दावा

हिंदुस्थानात गल्लीपासून दिल्लीपर्यंत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत असतानाच ईव्हीएम हॅक करता येतं आणि निवडणुकीचा निकालही फिरवता येतो, याचे पुरावे हाती लागले आहेत, असा खळबळजनक दावा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गब्बार्ड यांनी केला आहे.
ईव्हीएमवर टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेनेच ईव्हीएमचे पितळ उघडे पाडले आहे. गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गब्बार्ड यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच गौप्यस्फोट केला. ईव्हीएम मशीन सहज हॅक केले जाऊ शकते, याचे पुरावे हाती लागल्याची माहिती त्यांनी या बैठकीत दिली.
तरीही आयोगाचा तोच दावा
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने ईव्हीएमची पोलखोल केली असतानाही हिंदुस्थानच्या निवडणूक आयोगाने मात्र पुन्हा तोच राग आळवला. आपल्या देशात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमची तुलना इतर देशांतील ईव्हीएमशी करणे चुकीचे आहे. आपले ईव्हीएम हॅक करणे शक्य नाही. हे मशीन एका कॅलक्युलेटरप्रमाणे काम करते, असा दावा निवडणूक आयोगाने केला.
मोदी, केंद्र सरकार, निवडणूक आयोग गप्प का? – सुरजेवाला
तुलसी गब्बार्ड यांच्या दाव्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग गप्प का? निवडणूक आयोग सूत्रांच्या हवाल्याने ईव्हीएमचे समर्थन करणाऱ्या बातम्या का पेरत आहे, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी केला. सर्वेच्च न्यायालयाने गब्बार्ड यांच्या दाव्याची स्वतःहून दखल घ्यावी आणि तपास सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही सुरजेवाला यांनी केली.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कालच 2020च्या निवडणुकीतील सीआयएसएचे तत्कालीन संचालक ख्रिस व्रेब्स यांच्या भूमिकेबद्दल चौकशीचे आदेश दिले आहेत आणि आता ईव्हीएमबाबत हे पुरावे आमच्या हाती लागले आहेत. आमच्यासाठी हे मोठे यश आहे, असेही गब्बार्ड यांनी नमूद केले.
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात
इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धती पूर्णपणे असुरक्षित आहे. या पद्धतीने होणाऱ्या मतदानात सहज फेरफार करता येतो, असे तपासात उघड झाले आहे. हॅकर्ससाठी हा डाव्या हाताचा खेळ आहे. त्यामुळेच मतदारांचा निवडणूक व्यवस्थेवरचा विश्वास कायम राखायचा असेल आणि निवडणुका पारदर्शक होण्यासाठी देशभरात बॅलेट पेपरवर मतदान सक्तीचे करण्याची आवश्यकता आहे, असे तुलसी गब्बार्ड यांनी नमूद केले.