रेल्वे, इंडियन ऑईल आणि एचएएलचा लाचखोरीत सहभाग, लाच देणाऱ्या कंपन्यांना अमेरिकेच्या प्राधिकरणाने ठोठावला 300 टक्के दंड

अदानी उद्योग समूहाच्या लाचखोरीचे प्रकरण ताजे असतानाच अमेरिकेने हिंदुस्थानातील कंपन्यांशी भ्रष्ट व्यवहार ठेवणाऱया स्थानिक कंपन्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. मूग आयएनसी, ओरॅकल कॉर्पोरेशन आणि अल्बेमारले कॉर्पोरेशन या अमेरिकन कंपन्यांनी हिंदुस्थानातील रेल्वे, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) अशा कंपन्यांना लाच दिली. या प्रकरणी अमेरिकन प्राधिकरणाने लाचखोर कंपन्यांना लाच रकमेच्या 300 टक्क्यांहून अधिक दंड ठोठावला. भ्रष्टाचाराचा खटला टाळण्यासाठी कंपन्यांनी शेकडो मिलियन डॉलर्स दंड भरला.

सौर ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित कंत्राट मिळवण्यासाठी हिंदुस्थानातील अधिकाऱयांना 265 मिलियन डॉलर्सची लाच दिल्याच्या आरोपावरून अदानी उद्योग समूह अमेरिकेत कारवाईच्या कचाटय़ात सापडला आहे. अदानी उद्योग समूहाच्या कथित लाचखोरीने जगभर खळबळ उडाली. त्यापाठोपाठ अमेरिकन कंपन्यांनी हिंदुस्थानातील प्रमुख कंपन्यांशी भ्रष्ट संबंध ठेवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अमेरिकेतील रिसर्च आणि डिझाईन फर्म असलेली मूग आयएनसी ही कंपनी हिंदुस्थानी रेल्वे व एचएएलला मिलियन डॉलर्सची लाच देताना जाळ्यात सापडली. कंपनीने हे प्रकरण मिटवण्यासाठी अमेरिकन सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे 1.68 मिलियन डॉलर्सहून अधिक दंड भरला. ‘मूग’ची हिंदुस्थानातील उपकंपनी मूग मोशन कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कंत्राट मिळवण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे आणि एचएएल या पंपन्यांना लाच दिल्याचे उघडकीस आले आहे.

ओरॅकल कॉर्पोरेशनचा अनेक देशांत भ्रष्टाचार

अमेरिकेच्या ओरॅकल कॉर्पोरेशनने हिंदुस्थानबरोबरच यूएई, तुको आदी देशांशी भ्रष्ट संबंध ठेवल्याचा आरोप आहे. कंपनीने विशेषतः इंडियन रेल्वेला अधिक लाच दिली. 6.8 मिलियन डॉलरची लाच दिल्याचे प्रकरण कंपनीने 23 मिलियन डॉलर्सचा दंड भरून मिटवले.

अमेरिकेने उगारला कठोर कारवाईचा बडगा

कंत्राटांच्या हव्यासापोटी अनेक अमेरिकन पंपन्या भ्रष्टाचारात गुंतल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या प्राधिकरणाने विदेश पातळीवरील स्थानिक कंपन्यांच्या भ्रष्ट व्यवहाराविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. अदानी उद्योग समूहाच्या लाचखोरीनंतर कारवाई आणखी तीव्र केली आहे.

‘अल्बेमारले’ने 198 मिलियन डॉलर्स इतका भरला दंड

अमेरिकेतील केमिकल मॅनुफॅक्चरिंग कंपनी ‘अल्बेमारले’ने मागील काही वर्षांत विविध कंत्राटे मिळवण्यासाठी 63.5 मिलियन डॉलर्स इतकी रक्कम लाचेपोटी दिली. या लाचखोरीच्या गंभीर प्रकरणात खटला टाळण्यासाठी अखेर कंपनीने 198 मिलियन डॉलर्सहून अधिक दंड भरल्याची माहिती समोर आली आहे.

लाच घेणाऱ्या हिंदुस्थानी कंपन्यांवर कारवाई कधी?

अमेरिकेतील कंपन्यांनी हिंदुस्थानच्या सार्वजनिक क्षेत्रातील रेल्वे, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांसारख्या कंपन्यांना लाच दिली. या प्रकरणी अमेरिकेने लाच देणाऱया त्यांच्या कंपन्यांवर कारवाई केली आहे. मात्र अमेरिकन कंपन्यांकडून लाच घेणाऱया हिंदुस्थानातील कंपन्यांच्या अधिकाऱयांवर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. लाच देणाऱया अमेरिकन पंपन्यांवर कारवाई झाली, मग लाच घेणाऱया हिंदुस्थानी कंपन्यांवर कारवाई कधी, असा सवाल ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून उपस्थित केला. त्यांनी ‘द पायोनिअर’च्या वृत्ताचा फोटोदेखील शेअर केला.