
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर त्यांनी धडाधड निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. संपूर्ण जगावर अमेरिकेचे वर्चस्व राखण्यासाठी ट्रम्प हे मोठमोठे निर्णय घेत आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या निर्णयामुळे जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. अमेरिकेच्या बदलत्या धोरणामुळे युरोपातील अनेक देश त्रस्त झाले आहेत. ट्रम्प यांच्या नव्या धोरणाचा जबर फटका बसत असल्यामुळे फ्रान्सने आता अमेरिकन प्रशासनाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी परत करा, अशी नवीन मागणी केलीय.
फ्रान्सचे सोशालिस्ट आणि डेमोक्रॅटिक समूहाचे नेते राफेल ग्लुकसमॅन यांनी फ्रान्सला टॅरिफ लावण्याची धमकी देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केलीय. जे वैज्ञानिकांना कामावरून काढून टाकत आहेत, अत्याचार करणाऱ्यांची साथ देत आहेत. त्यांना माझे एकच सांगणे आहे, त्यांनी फ्रान्सने दिलेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी परत करायला हवा, असे राफेल ग्लुकसमॅन यांनी म्हटले आहे. फ्रान्सने अमेरिकेला एक गिफ्ट म्हणून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दिला होता, परंतु अमेरिकेला त्याची किंमत नाही. तुम्ही याला तुच्छ समजतात. त्यामुळे तुम्ही हा पुतळा परत करावा. तो फ्रान्समध्ये चांगला शोभून दिसेल. ट्रम्प प्रशासन चांगले काम करणाऱ्या लोकांना कामावरून काढून टाकत आहे, असेही त्यांनी म्हटले.