
सध्या बेरोजगारीचे संकट जागतिक स्वरुप धारण करत आहे. वाढत्या खर्चामुळे अनेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहे. त्यामुळे बेरोजगारीचे संकट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता अमेरिकी कंपनी बोइंगने कर्मचारी कपात केली असून बंगळुरूमधील 180 कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
अमेरिकन कंपनी बोईंगने मोठी कपात केली आहे. त्यात हिंदुस्थानातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. कंपनीने त्यांच्या बेंगळुरू केंद्रात काम करणाऱ्या 180 कर्मचाऱ्यांना एकाच वेळी काढून टाकले आहे. बोईंगने जागतिक स्तरावरील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून हिंदुस्थानात ही कपात केली आहे. हिंदुस्थानात बोईंगचे सुमारे 7000 कर्मचारी आहेत. त्यातील BIETC मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
कंपनीने गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे संकेत दिले होते. तसेच एकूण कर्मचाऱ्यांमध्ये 10 टक्के कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली होती. बोईंग जागतिक स्तरावर अनेक आव्हानांना तोंड देत आहे आणि त्यांनी धोरणात्मक बदल केले आहेत आणि अनेक पदे मर्यादित केली आहेत. बेंगळुरूमधील बोईंग अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान कॅम्पस हा अमेरिकेबाहेर त्यांच्या सर्वात मोठ्या गुंतवणूक युनिट्सपैकी एक आहे. या कर्मचारी कपातीचा ग्राहकांवर किंवा सरकारी कामावर परिणाम होणार नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.