
सेल्फीला नकार दिला म्हणून एका डॉक्टरने त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना हवाईतील ओहू येथे घडली आहे. अरिले कोनिग असे त्या महिलेचे नाव असून या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली आहे.
न्यूक्लिअर इंजिनियर असलेल्या अरिले कोनिगचे गेरहार्ड कोनिंग या डॉक्टरसोबत लग्न झाले होते. ते दोघेही सोमवारी ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यावेळी गेरहार्डला पत्नीसोबत सेल्फी काढायचा होता. मात्र अरिलेने नकार दिल्याने तो संतापला. त्यानंतर त्याने आधी लाथा बुक्क्याने तिला मारहाण केली. नंतर तिथे असलेल्या एका दगडाने तिच्या चेहऱ्यावर मारले. नंतर स्वत:कडील सिरींज तिच्या शरीरात घुसवल्या व तिला उंचावरून ढकलून द्यायचाचही प्रयत्न केला.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अरिलेला तो तेथेच सोडून घरी परतला. दरम्यान काही स्थानिकांना अरिले जखमी अवस्थेत सापडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गेरहार्डला अटक केली आहे.