
हातात बेड्या, पायात साखळदंडाने जखडून अमेरिकेने आतापर्यंत 400 हून अधिक बेकायदा स्थलांतरित हिंदुस्थानींना परत पाठवले. अमेरिकेने दिलेल्या वागणुकीवरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरले. हिंदुस्थानी नागरिकांकडून चोहोबाजूंनी टीका झाली. अमेरिकेहून परतलेल्या मोदींची पाठ फिरताच पुन्हा अमेरिकेने तशीच वागणूक बेकायदा स्थलांतरितांना दिली. आता अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने याबाबतचा व्हिडीओच ‘एक्स’वरून शेअर केला असून टेस्लाचे प्रमुख आणि ट्रम्प यांचे सरकारमधील सहकारी एलॉन मस्क यांनी या व्हिडीओला बेंडकुळय़ा दाखवत हे योग्यच असल्याचे म्हटले आहे.
41 सेकंदांच्या या व्हिडीओत बेकायदेशीर स्थलांतरितांना बेडय़ा आणि साखळदंडाने जखडून कशाप्रकारे विमानात नेले जाते हे दाखवले आहे. कॅप्शनमध्ये बेकायदा स्थलांतरित हिंदुस्थानींना एलियन असे संबोधण्यात आले आहे. बेकायदा स्थलांतरित एलियन्सची फ्लाईट असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. बेकायदा स्थलांतरितांना विमानात एक इंचही हलण्याची परवानगी नव्हती. पुरेसे पाणी आणि अन्नही दिले गेले नाही. स्वच्छतागृहातही वारंवार विनंती केल्यानंतर सोडले. तेदेखील स्वच्छतागृहापर्यंत तसेच ओढत नेऊन अक्षरशः आतमध्ये ढकलले. लहान मुले आणि महिलांनाही बेडय़ा घालून आणले, असा भयंकर अनुभव स्थलांतरितांनी मायदेशी परतल्यानंतर प्रसारमाध्यमांना सांगितला होता.
40 हजार बेकायदा चिनींना का हात लावत नाही?
अमेरिकेतील बेकायदा हिंदुस्थानी स्थलांतरितांना हिंदुस्थानात पाठवण्याचा सपाटा सध्या सुरू आहे, मात्र अमेरिकेत तब्बल 40 हजार बेकायदा चिनी स्थलांतरित राहत आहेत तर केवळ 18 हजार बेकायदा हिंदुस्थानी स्थलांतरित राहत आहेत. तरीही चीनचे केवळ 517 बेकायदा स्थलांतरित परत पाठवण्यात आले. जे चिनी नागरिक पडताळणीनंतर चिनी असल्याचे सिद्ध होईल त्यांनाच देशात घेतले जाईल असे चीनचे परराष्ट्र धोरण आहे. हिंदुस्थानही पडताळणी करतो, परंतु चीनचे धोरण अधिक गुंतागुंतीचे असल्याचे समोर आले आहे. दुसरे कारण म्हणजे टेस्लाची सर्वात मोठी बॅटरी निर्मिती कंपनी शांघाय येथे आहे. तिथून 40 टक्के बॅटरींचा पुरवठा होतो. अमेरिका अनेक बाबतीत चीनवर अवलंबून असून दोन्ही अर्थव्यवस्था मोठय़ा आहेत. त्यामुळेच अमेरिका अनेक गोष्टींत चीनला सवलत देत असल्याचे समोर आले आहे.
हिंदुस्थानकडे खूप पैसा, त्यांना गरज नाही – ट्रम्प
ट्रम्प यांनी मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाने हिंदुस्थानातील मतांचा टक्का वाढवण्यासाठी मंजूर केलेला 2.1 कोटींचा निधी रद्द केला. यावरून हिंदुस्थानकडे खूप पैसा आहे. त्यांची आर्थिक वाढ आणि त्यांच्याकडून लादण्यात येत असलेले प्रचंड आयात शुल्क लक्षात घेता त्यांना आर्थिक मदतीची गरजच काय, असा सवाल ट्रम्प यांनी केला आहे. आपण हिंदुस्थानला 2.1 कोटी अमेरिकन डॉलर्स का देत आहोत? त्यांच्याकडे खूप पैसा आहे. जगातील सर्वाधिक कर आकारणाऱया देशांपैकी ते एक आहेत. त्यामुळे आपण मतदार वाढीसाठी त्यांना इतके पैसे का देत आहोत, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी याबाबतच्या कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करताना दिली.
व्हिडीओत एका बकेटमध्ये बेडय़ा आणि साखळदंड ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. सुरक्षा रक्षक बेकायदा स्थलांतरितांना एकेक करून बेड्या आणि साखळदंड घालताना दिसत आहे. त्यांना हात, पाय आणि कंबरेभोवती बेड्या आणि साखळय़ांनी बांधले जाते. व्हिडीओच्या शेवटी बेकायदा स्थलांतरित विमानात साखळदंडासह प्रचंड कष्टाने चढताना दिसत आहेत.