मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणण्याचा मार्ग मोकळा; अमेरिकेच्या कोर्टाने याचिका फेटाळली

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. राणाने हिंदुस्थानात प्रत्यार्पण करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र अमेरिकेच्या न्यायालयाने सोमवारी त्याचे अपील फेटाळून लावले. त्यामुळे राणाला हिंदुस्थानात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात राणा हा वॉन्टेड आरोपी आहे. मुंबईतील हॉटेल ताज तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी हल्ला करून निरपराधी लोकांचे बळी घेण्यात आले. त्या हल्ल्याचा कट राणाने रचल्याचा आरोप आहे. याच आरोपावरून राणाला हिंदुस्थानात आणले जाणार आहे. त्यानंतर त्याच्याविरुद्ध 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा खटला चालणार आहे.

राणाला 2009 मध्ये दहशतवादी कारवायांतील सहभागाच्या आरोपावरून अमेरिकेत अटक करण्यात आली होती. यापूर्वी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला शस्त्रसाठा पुरवल्याच्या प्रकरणात अमेरिकेत त्याला दोषी ठरवले होते. हिंदुस्थानने त्याला 26/11च्या मुंबई हल्ल्याच्या खटल्यासाठी लवकरात लवकर प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाची अंतिम याचिकाही फेटाळून लावल्याने राणाला हिंदुस्थानात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.