अमेरिकेत अदानींविरुद्ध अटक वॉरंट, कंत्राट मिळवण्यासाठी 2 हजार कोटींची लाच दिल्याचा गुन्हा दाखल… बाजार कोसळला

मोदी सरकार व मिंधेंच्या संगनमतातून मुंबई-महाराष्ट्रासह अख्खा देश लुटण्याचे ‘उद्योग’ करणाऱ्या उद्योजक गौतम अदानींना गुरुवारी अमेरिकेतील कोर्टाने ‘वॉण्टेड आरोपी’ ठरवून अटक वॉरंट जारी केले. अदानींनी हिंदुस्थानात सोलर एनर्जी प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली अमेरिकेतील गुंतवणूकदारांकडून तब्बल 25 हजार कोटी रुपये उकळले. तसेच सोलर एनर्जीचे कंत्राट मिळवण्यासाठी हिंदुस्थानातील सरकारी अधिकाऱयांना 2 हजार 236 कोटींची लाच दिल्याचा आरोप आहे. या लाचखोरीचा भंडाफोड झाल्यानंतर अमेरिका-हिंदुस्थानसह जगभरात खळबळ उडाली आहे. हिंदुस्थानातील कोटय़वधींची कंत्राटे हडपून मोठमोठे घोटाळे करूनही ‘मोदी’कृपेमुळे ‘सेफ’ राहिलेल्या अदानींची अमेरिकेच्या या कारवाईमुळे ‘बुच’ लागणार आहे.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यानंतर अदानींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी ग्रीन एनर्जीमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली. त्याला काही तास उलटत नाही तोच अदानींची कंत्राट हडपण्यासाठीची लाचखोरी समोर आली आहे. अदानी ग्रीन एनर्जी लि. आणि एज्योर पॉवर ग्लोबल लि. या कंपन्यांशी संबंधित हा घोटाळा आहे. हिंदुस्थानातील दुसऱ्या क्रमांकाचे धनाढय़ उद्योजक गौतम अदानी यांच्याविरूद्ध मोदी सरकारने कारवाईची हिंमत दाखवली नाही. तथापि, अमेरिकेने ‘वॉन्टेड आरोपी’ घोषित करून मोदींच्या लाडक्या उद्योजकाविरुद्ध अटकेच्या कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईने हिंदुस्थानातील भ्रष्ट कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.

काकापुतण्याचा प्रताप

गौतम अदानींनी कंत्राटाचे डील करण्यासाठी पुतण्या सागर अदानीला हाताशी धरले होते. अदानी काका-पुतण्या व कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांनी अदानी ग्रीन एनर्जीसाठी 3 अब्ज डॉलरहून अधिक कर्ज, बॉण्ड मिळवण्यासाठी कर्जदार व गुंतवणूकदारांपासून लाचखोरीचा प्लान लपवल्याचे अमेरिकेतील सरकारी पक्षाने म्हटले आहे.

भाजपकडून सारवासारव

अदानींचा भ्रष्ट चेहरा जगासमोर येताच भाजपने सारवासारव केली. अदानी हे केवळ भाजपशासित राज्यांत काम करीत नाहीत, तर जेथे भाजप विरोधी पक्ष आहे, तिथेही अदानी समूहाला काम दिले जात आहे. अदानींचे नाव घेऊन पंतप्रधानांवर निशाणा साधणे हे खालच्या पातळीवरील राजकारण आहे, अशी प्रतिक्रिया देत भाजपने स्कत: ची कातडी वाचवण्याचा प्रयत्न केला.

आरोप फेटाळले

अमेरिकेच्या कोर्टातील गंभीर आरोप अदानी समूहाने फेटाळले आहेत. अमेरिकन डिपार्टमेंट ऑफ जस्टीस आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने अदानी ग्रीनच्या संचालकांकर केलेले सर्व आरोप तथ्यहीन व निराधार आहेत. आरोपपत्रात केलेले आरोप केवळ आरोप आहे. जोपर्यंत प्रतिवादी दोषी सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांना निर्दोष मानले जाईल, असे अमेरिकन न्याय विभागाने स्कत:च म्हटले आहे. या प्रकरणात शक्य ते कायदेशीर मार्ग अवलंबले जातील, असे अदानी समूहाने स्पष्ट केले आणि सर्व आरोपांचे खंडन केले.

अदानींनी महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी 2 हजार कोटी रुपये लावले ः संजय राऊत

अमेरिकेसारखीच कारवाई महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर होईल म्हणूनच आघाडीला पाडण्यासाठी विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात पैसा ओतला गेला, अदानींनी दोन हजार कोटी रुपये निवडणुकीसाठी लावले, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. ते म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्र उद्योगपती गौतम अदानींना विकायला काढला आहे. याच अदानींनी अमेरिकेतही टेंडर्स मिळवण्यासाठी 250 दशलक्ष डॉलर्स इतकी लाच दिल्याचा आरोप आहे, असे संजय राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी संगनमत करून,  भ्रष्टाचार करून गौतम अदानी यांनी सगळय़ा जागा आणि टेंडर बळकावण्याचा प्रयत्न केला आहे, असेही संजय राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन हजार कोटीपेक्षा जास्त पैसा निवडणुकीत खर्च करण्यात आला आहे. तो पूर्ण पैसा अदानींचा आहे, ही एकप्रकारे लाच आहे, असे संजय राऊत म्हणाले.

अदानींना तत्काळ अटक करा -नाना पटोले

अमेरिकेच्या तपास यंत्रणांच्या तपासात अदानीने मोठय़ा प्रमाणात लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही भ्रष्ट अदानीला अटक का केली जात नाही, असा सवाल करतानाच, भ्रष्ट अदानीला जेलमध्ये टाकावे ही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी रास्तच आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

अदानींनी 600 दशलक्ष डॉलर्सचे रोखे केले रद्द

लाचखोरीच्या गंभीर आरोपानंतर रोखे (बॉण्ड) रद्द करण्याची नामुष्की गौतम अदानी यांच्यावर ओढवली. अदानी उद्योग समूहाच्या उपकंपन्यांनी 600 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे रोखे जारी करण्याची प्रस्तावित योजना रद्द केली आहे. ‘अदानी ग्रीन एनर्जी’ कंपनीने रेग्युलेटरी फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

एफबीआयच्या चौकशीत पितळ उघडे 

सोलर एनर्जी प्रकल्पाच्या कंत्राटातील अनियमिततेच्या संशयावरून अमेरिकेतील प्रमुख गुप्तचर यंत्रणा ‘एफबीआय’ आणि बाजार नियामक ‘एसईसी’ने चौकशी केली. यावेळी गौतम अदानी यांनी हिंदुस्थानात अधिकाऱ्यांना लाच दिल्याचे व अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. अदानींनी हिंदुस्थानातील बाजार नियामक सेबीपुढेदेखील खोटी माहिती दिल्याचे दोन वर्षांपासून सुरू असलेल्या चौकशीत सिद्ध झाले आहे.

गौतम अदानी बुच लागणार

अदानी अमेरिकेत गेले आणि तेथील शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असलेल्या एज्योर पॉवर ग्लोबल लिमिटेडकंपनीशी साटेलोटे केले.

हिंदुस्थानातील अधिकाऱ्यांना 2,236 कोटींची लाच दिली. कंत्राट मिळवून 20 वर्षांत
16 हजार 882 कोटी रुपये नफ्याचा इरादा होता.

हिंदुस्थानात सोलर एनर्जी प्रकल्प उभारण्याचा प्लॅन बनवला. त्या प्रकल्पाच्या नावाने अमेरिकेतील गुंतवणूकदार तसेच जागतिक वित्त संस्थांना मोठमोठी स्वप्ने दाखवली आणि त्यांच्याकडून
25 हजार कोटी रुपये उकळले.

विजेचा दर महाग होता. त्यामुळे हिंदुस्थानात सोलर एनर्जीचे कंत्राट मिळवण्यात अडचणी आल्या. सरकार महागडी वीज घेण्यास तयार नव्हते.

घोटाळय़ातील गौतम अदानींचे नाव गोपनीय ठेवण्यासाठी डील करताना अदानींसाठी न्युमेरो युनोआणि बिग मॅनअसे कोडवर्ड कापरले.

अदानी समूहाचे अध्यक्ष, उद्योजक गौतम अदानी यांच्याविरुद्ध अमेरिकेतील न्यूयॉर्क फेडरल कोर्टाने लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक वॉरंट जारी केले आहे. अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानीसह एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अदानी इतर आरोपींनी लाचखोरीचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. अमेरिकेतील सिक्युरिटी अँड एक्स्चेंज कमिशनने हे गंभीर आरोप केले.

अमेरिकेच्या रडारवरील घोटाळेखोरांचे रॅकेट

गौतम अदानी

सागर अदानी

किनीत जैन

रंजित गुप्ता

सिरील कॅबनेस

सौरभ अग्रकाल

दीपक मल्होत्रा

रुपेश अग्रकाल

शेअर बाजारात हडकंप 2 लाख कोटी बुडाले

अदानी समूहाच्या कंत्राट घोटाळ्याने शेअर बाजारात भूकंप घडकला. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली व गुंतकणूकदारांचे तब्बल 2.24 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. शेअर बाजाराने 5 महिन्यांतील निच्चांकी पातळी गाठली. बीएसईचा 30 शेअर्सकाला इंडेक्स सेन्सेक्स लाल निशाण्याकर खुला झाला व काही मिनिटांतच 400 अंकांनी कोसळून 77,110 अंकांची पातळी गाठली.

आफ्टरशॉक्स केनियाने रद्द केले 6 हजार कोटींचे करार

अदानींविरोधात अटक वॉरंट निघताच त्याचे आफ्टरशॉक्स बसायला सुरुवात झाली असून केनियाने अदानींसोबत केलेले तब्बल 6 हजारांहून अधिक कोटींचा ऊर्जा करार रद्द केले आहेत. या करारांतर्गत केनियातील मुख्य विमानतळाचे अद्ययावतीकरणही करण्यात येणार होते. केनियाचे अध्यक्ष किलियम रुटू यांनी तपास यंत्रणा व इतर राष्ट्रांकडून तपशील मागवला आणि अदानींसोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय संसदेत जाहीर केला.

राहुल गांधींनी तोफ डागली

आम्ही अदानींचा मुद्दा बराच काळ मांडत आहोत आणि काहीही होत नाही. आता मोदीजींची विश्वासार्हता संपली आहे. आम्ही हळूहळू संपूर्ण नेटवर्क देशाला दाखवू.

मोदी तुरुंगात जातील

एका बाजूने अदानी आणि दुसऱ्या बाजूने नरेंद्र मोदी मिळून आपला देश लुटत आहेत. ज्या दिवशी आपलं सरकार गौतम अदानी यांना अटक करेल त्या दिवशी मोदीदेखील तुरुंगात जातील. त्यामुळे मोदी त्यांना अटक करणार नाहीत. मुळात मोदींमध्ये तेवढी हिंमत व क्षमता नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.