
अमेरिकी अर्थव्यवस्थेकडे साऱ्या जगाचं लक्षं लागलं आहे. कारण त्याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होतात. गेल्या वर्षाच्या शेवटी अमेरिकेत सत्ताबदल झाला आणि ट्रम्प सरकार सत्तेत आलं. पहिल्या दिवसापासूनच ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला. जागतिक बाजारपेठेवर परिणाम करतील अशी धोरणं आक्रमकरित्या राबवण्यास सुरुवात केली. टॅरिफ संदर्भात ट्रम्प प्रशासनानं कडक धोरण ठेवल्यानं जगभरात चिंता निर्माण झाली. वाढती महागाई आणि अमेरिकी सरकारची आर्थिक धोरणं यानंतर अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावणार अशी चिन्ह अभ्यासकांना दिसू लागली असून त्याचे परिणाम अन्य देशांनाही बसणार अशी स्थिती आहे. अमेरिकेच्या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना पहिल्या तिमाहित मोठा तोटा झाला आहे. विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना होणारा मोठा तोटा हा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरील संकाटाचे चिन्ह मानला जातो. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर चिंतेचे ढग जमा होऊ लागले आहेत.
एका रिपोर्टनुसार, अमेरिकेतल्या प्रमुख विमान कंपन्या डेल्टा एअर लाईन्स, युनायटेड आणि अमेरिकन एअरलाइन्सच्या कारभारात पहिल्या तिमाहित मोठी घसरण घसरणीचा अंदाज व्यक्त केला आहे. यानंतर ‘बिग थ्री’ अशा ओळख असलेल्या अमेरिकन विमानसेवा कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये घसरण झाली.
पहिल्या तिमाहितील नफ्याचा अंदाज कमी केल्यानंतर डेल्टा एअरलाइन्स प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये 6.4 टक्क्यांनी घसरले, तर अमेरिकन एअरलाइन्सला मोठ्या प्रमाणात तोटा होण्याची अपेक्षा असल्याने 3 टक्क्यांची घसरण झाली. रॉयटर्सने वृत्त दिले आहे की युनायटेड एअरलाइन्स देखील 3 टक्क्यांनी घसरली.
रिपोर्टनुसार, टॅरिफमधील गोंधळ आणि संभाव्य फेडरल सरकारच्या काही आक्रमक धोरणांच्या चिंतेमुळे अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीकडे जाऊ शकते अशी भीती निर्माण झाल्यानंतर सोमवारी बाजारपेठेत विक्री वाढली आणि मोठी घसरण पाहायला मिळाली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे आर्थिक मंदी आणि खर्च कमी करण्यावर जोर सर्वांचा जोर राहिल अशी चिंता निर्माण झाली आहे. ज्याचा सगळ्यात पहिला फटका बसतो विमान सेवांवर, कारण कंपन्या प्रवासावर नियंत्रण आणतात.
अचानक झालेला बदल मोठ्या अमेरिकन विमानसेवा कंपन्यांसाठी एक धक्का आहे. खरंतरं या कंपन्यांना दोन महिन्यांपूर्वी मजबूत प्रवास मागणी असल्यानं आणि त्यांच्या नेटवर्कमधील मोठ्या किंमतींमुळे फायदा होत होता. आतामात्र प्रवासांवर बंधनं येतील त्यामुळे कंपन्यांना तोटा होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बजेट कॅरियर साउथवेस्ट एअरलाइन्सने देखील पहिल्या तिमाहित युनिट महसूल वाढीचा अंदाज कमी केला आहे.
कंपनीला आता पहिल्या तिमाहीमध्ये प्रति शेअर 60 सेंट ते 80 सेंट पर्यंत तोटा अपेक्षित आहे, जो मागील अंदाजानुसार 20 सेंट ते 40 सेंट पर्यंत अंदाजित करण्यात आला होता.
विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्या या बहुतेकदा येणाऱ्या मंदीची चाहुल देणाऱ्या मानल्या जातात. कारण मंदीचा अंदाज आल्यावर ग्राहक आणि कंपन्या पहिले प्रवास कमी करण्यावर जोर देतात. उदाहरणार्थ, 2007 च्या तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीमध्ये डेल्टाचा महसूल 12% कमी झाला कारण तो ऑपरेटिंग तोट्यात गेला. त्यानंतर लवकरच जागतिक आर्थिक संकट आले. जून 2010 पर्यंत तो परिणाम कायम होता. तोपर्यंत निव्वळ नफा मिळवण्यात कंपनीला यश आलं नव्हतं.