इंडियन प्रीमियर लीगसाठी सौदीमध्ये नुकताच मेगा लिलाव पार पडला. या लिलावामध्ये अनसोल्ड राहिलेल्या एका खेळाडूने सय्यत मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तुफानी शतक झळकावत साऱ्यांचीच बोलती बंद केली आहे. उर्विल पटेल असे या खेळाडूचे नाव असून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. त्याने ऋषभ पंत याचा विक्रम मोडीत काढला आहे.
सय्यत मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गुजरातचा यष्टीरक्षक फलंदाज उर्विलपटेल याने अवघ्या 28 चेंडूत शतक ठोकले. त्रिपुराविरुद्ध खेळताना त्याने ही वादळी खेळी केली. याआधी पंतने 32 चेंडूत टी-20 शतक लगावला होते. उर्विलने पंतचा विक्रम मोडला आहे. तसेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतही वेगवान शतक ठोकणारा उर्विल पहिला खेळाडू ठरला आहे.
उर्विल पटेल याने त्रिपुराविरुद्ध धावांचा पाठलाग करताना 35 चेंडूत 113 धावा चोपल्या. 7 चौकार आणि 12 षटकारांच्या मदतीने त्याने ही खेळी सजवली. उर्विलचे हे पहिले टी-20 शतक आहे. याआधी पंतने 2018 मध्ये 32 चेंडूत शतक ठोकले होते. आता त्याचा हा विक्रम मोडत उर्विल हिंदुस्थानकडून सर्वात वेगवान टी-20 शतक ठोकणारा खेळाडू बनला आहे.
दुसरे वेगवान टी-20 शतक
टी-20 क्रिकेटमध्ये 28 चेंडूत शतक ठोकण्याचा कारनामा करणाऱ्या उर्विलने सर्वांचे लक्ष वेधले आहे. टी-20 क्रिकेटमधील हे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. याआधी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इस्टोनियाच्या साहिल चौहान याने 27 चेंडूत शतक झळकावण्याची कामगिरी केली होती.
10.20 षटकात विजय
दरम्यान, गुजरातविरुद्धच्या लढतीत त्रिपुराने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 155 धावा केल्या होत्या. त्यानंतर गुजरातने उर्विलच्या शतकी खेळीच्या बळावर 10.2 षटकांमध्ये हा सामना जिंकला. उर्विल आणि आर्य देसाईने गुजरातला 150 धावांची सलामी देत संघात विजय मिळवून दिला.
आयपीएल लिलावात हिंदुस्थानींचाच बोलबाला, दहा फ्रेंचायझींकडून 639.15 कोटी खर्च