
उरण नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे भवरा स्मशानभूमीतील वीज गायब झाली आहे. त्यामुळे मोबाईलच्या उजेडात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ मृतांच्या नातेवाईकांवर आली आहे. याबाबतचा फोटो व्हायरल झाला असून सरकारचा विकास जणू सरणावरच चढल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
उरणच्या भवरा गावातील शशिकांत हुमणे यांचे शुक्रवारी अकस्मात निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा भवरा स्मशानभूमीकडे निघाली. मात्र स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट झाल्यामुळे नातेवाईकांना काळाकुट्ट अंधार, दगडधोंडे तुडवत स्मशानभूमीकडे जावे लागले. स्मशानभूमी गाठल्यानंतर त्या ठिकाणी लाईट नसल्याचे समोर आले. अखेर मोबाईलच्या उजेडात नातेवाईकांना अंत्यसंस्कार करावे लागले. या समस्येबाबत मुख्याधिकारी समीर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
गर्दुल्यांचा अड्डा
ही स्मशानभूमी गर्दुल्यांचा अड्डा बनला आहे. रात्री उशिरापर्यंत दारुडे समूहाने बसतात. या दारुड्यांनी स्मशानभूमीतील बल्ब चोरले. शिवाय सर्व वायर्सची नासधूस केली. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून स्मशानभूमीत लाईट नाही. गर्दुल्यांचा बदोबस्त करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत नगररचनाकार निखिल ढोरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांना याबाबत काहीच माहीत नसल्याचे समोर आले. याविषयी माहिती घेऊन कार्यवाही करू असे ढोरे यांनी सांगितले.