वार्तापत्र- उरण – कागदावरचा विकास भाजपला भोवणार, शिवसेनेचे मनोहर भोईर यांना विजयाची संधी

उरण विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने विकासाच्या नावाखाली नुसत्या बोंबा मारल्या आहेत. विकास फक्त कागदावरच राहिला आहे. प्रत्यक्षात एकही प्रश्न भाजपच्या विद्यमान आमदारांना सोडवता आला नाही. वाढत्या औद्योगिकीकरणानंतरही स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात ते अपयशी ठरले. त्यांमुळे त्यांच्या विरोधात मतदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. परिणामी या विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या तिरंगी लढतीमध्ये उरणकरांशी गेले पाच वर्षे सातत्याने संपर्कात राहून त्यांचे प्रश्न सोडवणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांचे पारडे जड झाले आहे. भोईर यांच्या प्रचार सभा आणि प्रचार फेऱ्यांना सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांची झोप उडाली आहे.

उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मनोहर भोईर, भाजपचे महेश बालदी आणि शेकापचे बंडखोर प्रीतम म्हात्रे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. भोईर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. 50 हजार रहिकाशांचे वास्तव्य असलेल्या व उरणकरांच्या जीवनमरणाशी निगडीत असलेल्या नौदलाच्या सेफ्टीझोन, जेएनपीएने विस्थापित केलेल्या वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे पुनर्वसन आदी प्रश्न स्थानिक भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याचे आहेत. उरण परिसरात येऊ घातलेल्या नैना, अलिबाग-किरार कॉरिडॉर, तिसरी मुंबई व इतर विविध प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमीन संपादन करण्यासाठी शासनाने मोहीमच उघडली आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले गेले आहेत. यावर बालदी नेहमी मूग गिळूनच गप्प बसले.त्यामुळे त्यांच्या विरोधात भूमिपुत्रांमध्ये संताप आहे. उरणमधील पायाभूत सुविधा, अपघात, वाहतूककोंडी, हॉस्पिटल, रस्ते  यासाठी आंदोलने करण्यात आली. ही विकासकामे करण्यातही बालदी यांना अपयश आले.

 मनोहर भोईर आपला माणूस

शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर हे 1995 पासून राजकारणात सक्रिय आहेत. 2014 च्या निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले. मात्र 2019 च्या निवडणुकीत मतांच्या विभागणीमुळे त्यांचा अत्यंक कमी मतांनी पराभव झाला. मात्र या पराभवानंतर निराश न होता ते गेली पाच वर्षे जनतेची सेवा करीत आहेत. आमदार झाल्यानंतर त्यांच्या घरी प्रत्येक दिवशी सकाळपासून नागरिकांची यात्रेसारखी गर्दी असायची. गेल्या पाच वर्षांत ही गर्दी कमी झालेली नाही. आमदार नसतानाही त्यांनी नागरिकांना अडचणीच्या काळात मदत करणे सुरूच ठेवल्यामुळे त्यांचा जनाधार मोठया प्रमाणात वाढला आहे. त्याचा त्यांना या निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे.