
प्रेयसीची निघृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे झुडपात फेकणारा नराधम प्रियकर दाऊद शेख याला त्वरित फासावर लटकवा अशी जोरदार मागणी करीत उरणमधील संतप्त नागरिकांनी आज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून सर्वपक्षीय कार्यकर्ते, महिला तसेच नागरिक एकवटले आहेत. महाभयंकर हत्याकांड घडूनही भाजपचे स्थानिक आमदार महेश बालदी मोर्चात सहभागी होण्याऐवजी आपल्या कार्यालयात एसीची थंड हवा खात बसले होते. त्यामुळे मोर्चातील चिडलेल्या महिलांनी बालदी यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या देत त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. मोर्चातील महिलांचा संताप एवढा अनावर झाला होता की, त्यांनी बालदी यांच्या कार्यालयावर बांगड्या फेकल्या. दरम्यान, महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या असून महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून आले आहे. आज सरकारच्या विरोधात जबरदस्त आक्रोश दिसून आला.
उरणच्या प्रतीक अपार्टमेंटमध्ये राहणारी यशश्री शिंदे (22) हिची प्रेमप्रकरणातून डोक्यात दगड घालून निघृण हत्या झाल्याचे शनिवारी उघडकीस आले होते. ही हत्या दाऊद शेख याने केली असून तो फरार झाला आहे. दाऊद या सैतानाने यशश्रीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते निर्जनस्थळी फेकून दिले. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण शिंदे कुटुंबाचे भावविश्व उद्ध्वस्त झाले आहे.
■ उरणच्या चौकाचौकातून मोर्चा निघाल्यानंतर तो पोलीस ठाण्यावर येऊन धडकला. या वेळी सरकार व पोलिसांविरोधात घोषणा देण्यात आल्या.
■ व्यापाऱ्यांनीदेखील बाजारपेठ बंद ठेवून मोर्चात सहभाग घेतला. नराधमाला पकडून फासावर लटकवा अशी मागणी करण्यात आली.
■ यशश्री अकरावीत असताना फरार दाऊद शेखने तिच्याशी गैरवर्तन केले होते. पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
शाब्दिक चकमक आणि खडाजंगी
उरणमध्ये संतापजनक घटना घडूनही नागरिकांच्या मोर्चात सहभागी न घेणारे भाजपचे आमदार महेश बालदी यांना महिलांनी चांगलाच इंगा दाखवला. त्यातील काही जणींनी तर त्यांच्या कार्यालयावर बांगड्या फेकल्या. या वेळी बालदी यांचे समर्थक व मोर्चेकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. त्यामुळे काही काळ वातावरण चांगलेच तापले होते. या आक्रोशानंतर पोलिसांनी बालदी यांच्या कार्यालयाबाहेरील बंदोबस्त वाढवला आहे.