
उद्योगपती गौतम अदानी यांच्या ताब्यात असलेल्या इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स लिमिटेड या कंपनीत आज संध्याकाळी भीषण स्फोट झाला. नाफ्ताच्या टाकीची साफसफाई तसेच दुरुस्ती सुरू असताना ही दुर्घटना घडली असून त्यात एक तरुण अभियंता गंभीर जखमी झाला आहे. हा स्फोट एवढा भयानक होता की जवळचे धुतूम गाव अक्षरशः हादरले. अनेक ग्रामस्थ भीतीपोटी घरातून सैरावैरा पळाले. दरम्यान स्फोट आणि आग याची झळ बाजूच्या गावाला बसली असती तर मोठा अनर्थ घडला असता. या स्फोटाची चौकशी करावी, अशी मागणी धुतूमवासीयांनी केली आहे.
अदानी व्हेंचर्स कंपनीत पेट्रोल, डिझेल व नाफ्ता या अतिज्वलनशील रसायनांची साठवणूक केली जाते. आज संध्याकाळी सवापाचच्या सुमारास नाफ्ताच्या रिकाम्या टैंक नंबर 22 मध्ये साफसफाई तसेच दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. या टँकची क्षमता 30 हजार किलो लिटर एवढी आहे. काम सुरू असताना अचानक स्फोट झाला आणि एकच घबराट उडाली. या स्फोटामध्ये रोहित सरगर हा तरुण अभियंता गंभीर जखमी झाला असून त्याला नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात दाखल केले आहे.
ऑक्सिजन, सोडियम सल्फेट, नाफ्ताचा संपर्क झाला आणि..
अदानी व्हेंचर्स कंपनीतील नाफ्ताच्या टँकमध्ये सफाईचे काम सुरू असतानाच ऑक्सिजन, सोडियम सल्फेट, नाफ्ता यांचा संयुक्तपणे संपर्क झाला. त्यामुळे मोठा स्फोट होऊन आग लागली असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली. दरम्यान या स्फोटाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
माहिती देण्यास टाळाटाळ
उद्योगपती अदानी यांनी दोन वर्षांपूर्वी या कंपनीचा ताबा घेतला आहे. या आधी ही कंपनी केंद्र सरकारच्या अखत्यारित होती. कंपनीने कोणत्या परवानग्या घेतल्या याची माहिती मागवूनही ती देण्यास सतत टाळाटाळ होत असल्याची माहिती धुतूम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रेमनाथ ठाकूर यांनी दिली आहे. आजच्या स्फोटामुळे कंपनीतील कामगारांच्या तसेच ग्रामस्थांच्याही सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.