
उरण केगाव, वशेणी, डाऊरनगर, नवीनशेवे, खोपटे, तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 12 शाळांमध्ये परसबागा फुलल्या आहेत. पालक, मेथी, चवळी, टोमॅटो, कोबी, मिरचीची लागवड करण्यात आली आहे. यातून मिळणाऱ्या ताजा भाज्या शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारातून दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना योग्य पोषण आहार मिळत असल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले.
उरण तालुक्यातील मोठीजुई, आवरे, नागाव, भेंडखळ, पागोटे, विंधणे आणि मुळेखंड आदी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये ‘माझी शाळा माझी परसबाग’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ‘माझी शाळा माझी परसबाग’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना कार्यानुभवाचे विशेष धडे मिळावे, श्रममुल्याचा विकास व्हावा या अनुषंगाने शालेय परिसरामध्ये या परसबागा फुलवण्यात आल्या आहेत.
अशी घेतात काळजी
बागेत चवळी, पालक, मेथी, कोबी, टोमॅटो, वांगी, कडीपत्ता अशा प्रकारच्या मिरची, फळभाज्या आणि फुलभाज्यांची विविध लागवड करण्यात आली आहे. तीन महिने या परसबागेची योग्य सेंद्रिय खत आणि पाणी देऊन काळजी घेण्यात येते.