Manoj Soni resign : यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा, कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सोडलं पद

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिला आहे. वैयक्तीक कारणांमुळे सोनी यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे सोनी यांचा कार्यकाळ 2029 मध्ये पूर्ण होणार होता. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी पद सोडले आहे. मात्र त्यांचा राजीनामा स्वीकारला अथवा नाही याबाबत माहिती मिळालेली नाही.

मनोज सोनी हे 2017 मध्ये लोकसेवा आयोगात सदस्य म्हणून रुजू झाले होते. 16 मे 2023 रोजी त्यांनी अध्यक्षपदाची कारभार स्वीकारला. मात्र कार्यकाळ पूर्ण होण्यास 5 वर्ष बाकी असतानाच त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस पूजा खेडकर हिचे प्रकरण चर्चेत असतानाच मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

‘द हिंदू’च्या वृत्तानुसार, मनोज सोनी यांनी जून महिन्याच्या अखेरीस राजीनामा दिला होता. या राजीनाम्याचा आणि यूपीएससी उमेदवारांनी बनावट कागदपत्र, घोटाळा करून मिळवलेल्या नोकऱ्यांच्या वादाशी संबंध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनोज सोनी यांनी वैयक्तीक कारणांमुळे पद सोडले असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवल्याचे कळते. सरकारने नवीन अध्यक्षाचे नावही जाहीर केले नसल्याने सोनी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला अथवा नाही याबाबत स्पष्टता नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सोनी यांना आता आपल्या उर्वरित आयुष्याचा काळ गुजरातमधील स्वामिनारायण पंथाची शाखा अनुपम मिशनला द्यायचा आहे. 2020 मध्ये दीक्षा घेतल्यानंतर ते अनुपम मिशनमध्ये साधू बनले होते.

ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2005 मध्ये मोदींनी त्यांना वडोदरा येथील एसएस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्त केले होते. वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी ते कुलगुरू बनले होते. देशातील सर्वात तरुण कुलगुरूचा मान त्यांना मिळाला होता.