पूजा खेडकर यांना दणका आयएएस उमेदवारी रद्द, भविष्यात परीक्षा देण्यास बंदी

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या यूपीएससी करीअरला अखेर ब्रेक लावण्यात आला आहे. यूपीएससीने पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची आयएएस पदासाठीची उमेदवारी रद्द केली आहे. तसेच त्यांना भविष्यात परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे.

आलिशान कार आणि त्यावरील अंबर दिवा यामुळे वादात सापडलेल्या पूजा खेडकर यांचे एकामागून एक कारनामे उघडकीस आले होते. त्यांचे शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले होते. यूपीएससी आणि पंतप्रधान कार्यालयाने याची गंभीर दखल घेत यासंदर्भातील अहवाल मागवून खेडकर यांची चौकशी सुरू केली होती.  त्यात त्या दोषी आढळल्यानंतर यूपीएससीने पूजा खेडकर यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. तसेच त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावली होती. नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार पूजा खेडकर यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 30 जुलैपर्यंत वेळ देण्यात आला होता. मात्र त्या आपली बाजू मांडण्यास किंवा कागदपत्रांची तपासणी करण्यास हजर झाल्या नाहीत. यानंतर यूपीएससीने खेडकर यांची आयएएस पदासाठीची उमेदवारी रद्द करत त्यांना भविष्यात परीक्षा देण्यास बंदी घातली आहे.

अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव

पूजा खेडकर यांच्यावर दिल्ली पोलिसांनी यायाधीच खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली आहे. पूजा या 47 टक्के दिव्यांग असून यासंदर्भातील प्रमाणपत्र एम्सच्या बोर्डाने जारी केले आहे. हे प्रकरण यूपीएससीच्या कार्यकक्षेत येते आणि त्यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत, असा दावा पूजा खेडकर यांच्या वकिलांनी कोर्टात करत अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे. सरकारी वकिलांनी पूजा खेडकर यांना अटकपूर्व जामीन देण्यासही विरोध केला आहे. पूजा खेडकरला जामीन मिळाल्यास ती चौकशीत पुढे सहकार्य करणार नाही, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. या प्रकरणावर गुरुवारी कोर्ट आपला निर्णय देणार आहे.