असंवेदनशीलतेने केलेल्या कारवाईने परिस्थिती चिघळली, याला भाजप जबाबदार; संभल हिंसाचारावर राहुल गांधी यांचा संताप

उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीत सर्वेक्षणावरुन सुरु झालेला गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता या प्रकरणावरुन लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. प्रशासनाने सर्व पक्षांची बाजू  ऐकून न घेता असंवेदनशीलतेने केलेल्या कारवाईमुळे परिस्थिती आणखी चिघळली आणि अनेकांच्या मृत्यूचे कारण बनले. याला थेट भाजप सरकारच जबाबदार असल्याचा संताप राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

याप्रकरणी राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले, उत्तर प्रदेश संभलमध्ये सुरु असलेल्या वादावर राज्य सरकारचा पक्षपाती आणि उतावळेपणाची वृत्ती अत्यंत दुर्दैवी आहे. हिंसाचार आणि गोळीबारात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना आहेत. राहुल गांधी पुढे म्हणाले की, प्रशासनाने सर्व पक्षांची बाजू  ऐकून न घेता असंवेदनशीलतेने केलेल्या कारवाईमुळे परिस्थिती आणखी चिघळली आणि अनेक लोकांच्या मृत्यूचे कारण बनले-याला थेट भाजप सरकारच जबाबदार आहे. भाजप सत्तेचा वापर करुन हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे. ते ना राज्याच्या हितासाठी काम करत ना देशाच्या हितासाठी काम करत अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली. राहुल गांधी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणात लवकरात लवकर हस्तक्षेप करुन न्याय देण्याची मी विनंती करतो. तसेच शांतता आणि परस्पर सौहार्द राखण्याचे मी आवाहन करतो. आता आपल्याला जातीयवाद आणि द्वेष न करता देश एकता आणि संविधानाच्या मार्गाने पुढे जाण्यासाठी एकत्र यायला हवे असेही राहुल गांधी म्हणाले.

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील हिंसाचारानंतर निर्माण झालेला तणाव लक्षात घेता संभल तहसीलमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. शिवाय 12वीपर्यंतच्या सर्व शाळा सोमवारी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय जिल्ह्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 163 अन्वये 30 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.