UPI Down – यूपीआय सेवेचे उडाले तीन तेरा; Paytm, PhonePe आणि Google Pay मधून व्यवहारास अडचण

देशभरातीत यूपीआय सेवा शनिवारी पुन्हा एकदा ठप्प झाली. यामुळे Paytm, PhonePe आणि Google Pay मधून व्यवहार करण्यास अडचण निर्माण झाली आहे. डिजिटल पेमेंट करताना अचानक हा अडथळा निर्माण झाल्याने लाखो नागरिकांना त्रास सहन करावा लागला. काही काळ ही सेवा ठप्प होती, मात्र त्यानंतर ती पुन्हा सुरू झाली. Downdetector वेबसाईटने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास यूजर्सला डिजिटल पेमेंट करताना अडथळा येऊ लागला. यादरम्यान यूजर्सला Paytm, PhonePe आणि Google Pay वरून व्यवहार पूर्ण करता आले नाहीत. याबाबत अनेक यूजर्सने सोशल मीडियावर पोस्टही शेअर केल्या. त्यानंतर सोशल मीडियावर #UPIDown हा हॅशटॅग ट्रेंड झाला.

गेल्या काही दिवसांमध्ये यूपीआय सेवेतील हा तिसरा मोठा व्यत्यय आहे. त्यामुळे यूजर्स त्रस्त झाले आहेत. अनेक छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल सेवेचा वापर केला जातो. त्यामुळे यूपीआय सेवा ठप्प झाल्याचा फटका सर्वांनाच बसला आहे.

दरम्यान, एसबीआय, गुगल पे, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकिंगची यूपीआय सेवाही ठप्प झाली होती. डिजिटल पेमेंटसाठी देशभरात यूपीआय सेवेचा वापर केला जातो. चहाच्या दुकानापासून रेल्वे तिकीट बुकिंगपर्यंत सर्वत्र यूपीआयचा वापर होतो. अशात ही सेवा ठप्प झाल्याने याचा लाखो लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच वारंवार सेवा ठप्प होत असल्याने त्याच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक यूजर्सने तर आता रोख रक्कम बाळगावी लागेल असेही म्हटले. तर काहींनी यावर भन्नाट मिम्सही शेअर केले आहेत.