लग्नाची वरात अन् हवेत फायरिंग, नवरदेवाचा डान्स पाहणाऱ्या अडीच वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू; व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एका लग्नाची वरात अडीच वर्षीय मुलाच्या जीवावर बेतली आहे. गोळी डोक्यात लागल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल तपासाला सुरुवात केली आहे.

सदर घटना उत्तर प्रदेशातील आघाहपूर या गावामध्ये घडली आहे. गावात लग्नाची वरात निघाली होती. त्यामुळे डान्स आणि गाण्यांचा आवाज सुरू होता. मुख्य रस्त्यातून वरात जात असल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतींमधून लोकं नवरदेवाची वरात पाहत होते. अडीच वर्षीय दुर्वेश (बदलेले नाव) आपल्या कुटुंबीयांसोबत बाल्कनीमधून वरातीचा आनंद घेत होता. याच दरम्यान नवरदेवाच्या एका मित्राने आनंदाच्या भरात हवेत फायरिंग केली आणि दुर्दैवाने बंदुकीतून सुटलेली गोळी बाल्कनीत उभ्या असलेल्या दुर्वेशच्या डोक्यात लागली. या दुर्घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.