तरुणाईचे नको ते धाडस कधी कधी त्यांनाच संकटात टाकते. अशीच एक घटना बुलंदशहरामध्ये समोर आली आहे. ट्रॅक्टरवर स्टंटबाजी करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. दोन तरुण आपापल्या ट्रॅक्टरला रस्सी बांधून एकमेकांचे ट्रॅक्टर खेचत होते. यावेळी एका तरुणाचा ट्रॅक्टर खड्ड्यात कोसळून त्याचा मृत्यू झाला. तेजवीर असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ट्रॅक्टर चालक कालुआ आणि तेजवीर दोघेही एकमेकांचा ट्रॅक्टर पूर्ण ताकदीने ओढत होते. स्टंटदरम्यान ट्रॅक्टर चालक तेजवीरचा ट्रॅक्टर नियंत्रणाबाहेर गेला आणि खड्ड्यात उलटला. यात तेजवीरचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती न देता मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी कालुआ नावाच्या दुसऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.