शस्त्रक्रियेदरम्यान सर्जिकल स्पंज ओटीपोटात राहिला, सेप्टिसीमियामुळे महिलेचा मृत्यू

शस्त्रक्रियेदरम्यान ओटीपोटात सर्जिकल स्पंज राहिल्याने सेप्टिसीमियामुळे 34 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली. खेलवती शंकर असे मयत महिलेचे नाव आहे. सर्जिकल स्पंज काढण्यासाठी महिलेवर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा दंडाधिकारी संजय कुमार सिंह यांनी संबंधितांवर कारवाई केली. मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ आलोक कुमार यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

लघवीतून रक्तस्त्राव होत असल्याने खेलवती शंकर या महिलेला 7 जुलै रोजी देवीपुरा गावातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा महिला रुग्णालयात वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉ. आशा गंगवार त्याच दिवशी महिलेची हिस्टेरेक्टॉमी केली.

हिस्टेरेक्टॉमीनंतर 23 जुलै रोजी खेलवतीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. यावेळी तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र त्यानंतर खेलवतीला वारंवार ओटीपोटात तीव्र वेदना आणि सूज जाणवत होती. यानंतर 1 डिसेंबर रोजी महिलेचा पती तिला बरेलीतील एका खासगी रुग्णालयात घेऊन गेला.

महिलेच्या सीटी स्कॅन अहवालात स्पंजच्या अवशेषांमुळे तिच्या अंतर्गत अवयवांमध्ये पू झाल्याचे आणि सूज आल्याचे स्पष्ट झाले. यानंतर स्पंज काढण्यासाठी डॉक्टरांनी 1 आणि 5 डिसेंबरला दोन शस्त्रक्रिया केल्या, मात्र दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच तिचा मृत्यू झाला.