तुकडे करून ड्रममध्ये भरेन, प्रियकरासोबत रंगेहाथ पकडताच पत्नीची धमकी; अभियंत्याची कारवाईची मागणी

मेरठमधील घटनेप्रमाणे हत्या करत तुकडे करुन ड्रममध्ये भरेन अशी धमकी पत्नीने पतीला दिली. यानंतर सरकारी अभियंता असलेल्या पीडित पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकरावर कारवाईची मागणी केली आहे. धर्मेंद्र कुशवाह असे पीडित पतीचे नाव असून ते गोंडा येथील जल निगममध्ये तैनात आहेत.

कुशवाह यांचा 2016 मध्ये माया मौर्यासोबत प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक मुलगी देखील आहे. लग्नानंतर काही दिवस सर्व सुरळीत सुरू होतं. यानंतर मायाने पतीला आपल्या नावावर तीन टॅक्सी घेण्यास सांगितले. कुशवाह यांनी हफ्त्यावर तीन टॅक्सी घेतल्या. यानंतर 2022 मध्ये त्यांनी नगर कोतवाली भागात जमिन खरेदी केली. या जमिनीवर घर बांधण्याचे कामकाज त्यांनी पत्नीचा नातेवाईक नीरज मौर्याला दिले.

नीरज मौर्यासोबत पत्नीचे अनैतिक संबंध जुळल्याचा कुशवाह यांनी आरोप केला आहे. 7 जुलै 2024 कुशवाह यांनी पत्नीला नीरजसह आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. यानंतर कुशवाह यांनी पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना विरोध केला. यामुळे पत्नी नीरजसोबत निघून गेली. त्यानंतर 25 ऑगस्ट 2025 रोजी माया नीरजसोबत बळजबरीने कुलूप तोडून घरी आली. दोघांनी कुशवाह यांना मारहाण करत त्यांच्याकडील सोन्याची चैन हिसकावून पळ काढला.

अखेर 1 सप्टेंबर 2024 रोजी कुशवाह यांनी पत्नी माया आणि नीरजविरोधात गुन्हा केला. यानंतर दुसऱ्या दिवशी माया आणि नीरज आपल्या तीन साथीदारांसह पतीच्या घरी आले. पतीला मारहाण करत घरातील काही सामान घेऊन पळाले. याप्रकरणी पुन्हा कुशवाह यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. मायाच्या धमक्यांना घाबरुन कुशवाह हे भाड्याच्या घरात रहायला गेले. मात्र तेथेही पत्नीने पाठ सोडली नाही.

29 मार्च 2025 रोजी पत्नीने भाड्याच्या घरात जाऊन पतीला पुन्हा मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कुशवाह यांनी 112 नंबर वर कॉल करून मदत मागितली. मेरठ ड्रम हत्याकांडाची पुनरावृत्ती करण्याची धमकी पत्नीने दिल्याने घाबरलेल्या कुशवाह यांनी पत्नी आणि तिच्या प्रियकरावर कारवाईची मागणी केली आहे.