
सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी माणसं काय करतील याचा नेम नाही. मात्र त्यांचा हाच नको तो प्रयत्न कधी कधी त्यांच्या जीवावर बेततो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात समोर आली आहे. चालत्या ई-रिक्षाच्या छतावर नाचत रील्स बनवताना तोल जाऊन खाली पडल्याने एका इसमाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गाझीपूरमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली.
चंद्रशेखर रावत (55) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो पोस्टमार्टम हाऊसमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी होता. गुरुवारी रात्री तो डान्स रील बनवण्यासाठी ई-रिक्षाच्या छतावर चढला. यादरम्यान चालकाने गाडी सुरू केली. त्याचा पाय कॅरिअरमध्ये अडकला आणि तो तोल जाऊन जमिनीवर पडला.
उपस्थित लोकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.