उत्तर प्रदेशात कावड मार्गावर विक्रेत्यांना नाव लिहिण्याचे आदेश, विरोधकांकडून पोलीस आणि योगी सरकारवर टीका

उत्तर प्रदेशात 22 जुलैपासून कावड यात्रा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुझफ्फरनगर पोलिसांनी कावड रोडवरील दुकानांवर, हातगाडीवर मालकांनी त्यांची नावे लिहावीत, असे आदेश दिले आहेत. कावडियांमध्ये कोणताही गोंधळ उडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. योगी आदित्यनाथ सरकारच्या परवानगीशिवाय पोलीस असे आदेश देऊ शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकार आणि पोलिसांवर जोरदार टीका होत आहे.

एएमआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मुझफ्फरनगर पोलिसांची तुलना हिटलरशी केली आहे. तर सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी गुड्डू, मुन्ना, छोटू किंवा फत्ते कोणाच्या नावावरून काय ओळखले जाईल? न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी, असे आदेश म्हणजे सामाजिक गुन्हा आहे, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ सरकारवर टीकास्त्र सोडले.

पोलीस नाझींसारखे वागताहेत जावेद अख्तर

विशिष्ट धार्मिक समुदायाच्या मार्गातील सगळ्या दुकानांवर आणि रेस्तरॉँवर तसेच वाहनांवर त्यांच्या मालकांची नावे लिहावीत. हे कशासाठी? जर्मनीतील नाझी लोक अशाच प्रकारे ज्यूंच्या घरांवर खूण करून जायचे, अशी टीका गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी केली आहे.