
उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अलीगड जिल्ह्यात एका कुलूप बनवणाऱ्या कारागारीला आयकर विभागाने चक्क 11 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. नोटीस पाहताच कारागीरासह त्याच्या कुटुंबालाही धक्का बसला. योगेश शर्मा असे या कारागीराचे नाव आहे.
शर्मा हे उदरनिर्वाहासाठी एका कुलूप बनवणाऱ्या कारखान्यात काम करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असून ते कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतात. योगेशची पत्नी गेल्या दोन वर्षांपासून गंभीर आजाराने ग्रस्त आहे. घराचे वीजबील भरण्याइतकेही पैसे त्यांच्याकडे नाहीत. अशी बिकट परिस्थिती असताना योगेश शर्मा यांच्या नावाने आयकर विभागाने 11 कोटींची नोटीस पाठवताच सर्वांनाच धक्का बसला.
आयकर विभागाकडून नोटीस मिळाल्यानंतर योगेशने सरकारकडे न्यायासाठी अपील केले आहे. काही महिन्यांपूर्वीही आयकर विभागाने 10 लाख रुपयांची नोटीस पाठवल्याचे योगेश शर्मा यांनी सांगितले.