
लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पती-पत्नी स्टेजवर एकमेकांसोबत डान्स करत होते. नाचता नाचता अचानक पती खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. नाचताना हृदयविकाराचा झटका आल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वसीम सरवत असे 50 वर्षीय मयत व्यक्तीचे नाव असून ते बिझनेसमन आहेत. वसीम आणि त्यांची पत्नी फराह यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी पिलीभीत बायपास रोडवर एका हॉलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीसाठी सर्व नातेवाईक, मित्र परिवार उपस्थित होता.
पार्टीत वसीम आणि त्यांची पत्नी फराह दोघे स्टेजवर एकमेकांसोबत डान्स करत होते. नाचत असतानाच वसीम अचानक जमिनीवर कोसळले. त्यांना बेशुद्धावस्थेत तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वसीमच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.