दिब्रूगड एक्सप्रेसचे 15 डबे रुळावरून घसरले, चार प्रवाशांचा मृत्यू; 25 जखमी

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड-दिब्रूगड एक्सप्रेसच्या 3 एसीसह तब्बल 15 डबे रुळावरून घसरले. यातील 3 डबे पूर्णपणे उलटले. या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 प्रवाशी गंभीर जखमी झाले. तर दोन प्रवाशांचे पाय कापले गेल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. जखमींपैकी बहुतांश प्रवाशी एसी कोचमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघातानंतर प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून बाहेर उडय़ा मारल्या.

अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली. डबे अक्षरशः कापून ट्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. अपघातापूर्वी लोको पायलटने स्फोटाचा आवाज ऐकल्याचा दावा ईशान्य रेल्वेचे सीपीआरओ पंकज कुमार यांनी केला आहे. एक्सप्रेस चंदीगडहून दिब्रूगडला जात होती. झिलाही रेल्वे स्थानकाजवळ गोसाई दिहवा येथे अपघात झाला. दरम्यान, अपघातामुळे रेल्वे रुळही उखडले गेल्याची माहिती आहे.

सामान्यांचा जीव जातोय, सरकार मात्र बुलेट ट्रेनच्या मागे – आदित्य ठाकरे

एकीकडे देशाचे रेल्वेमंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे निवडणूक प्रमुख अश्विनी वैष्णव आपला वाढदिवस साजरा करत आहेत तर दुसरीकडे आजच पुन्हा एकदा मोठा रेल्वे अपघात झाल्याची घटना घडलीय. दिब्रुगड-चंदिगड एक्स्प्रेसला झालेल्या अपघाताची बातमी अस्वस्थ करणारी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. एकीकडे आधुनिकतेच्या थापा मारायच्या आणि दुसरीकडे सामान्य हिंदुस्थानवासीयांच्या दळणवळणाचे महत्त्वाचे माध्यम असलेल्या रेल्वेच्या सुरक्षेकडे कानाडोळा करायचा, असे बराच काळ सुरू आहे. मुंबईच्या लोकल ट्रेन्स असोत की देशभरातल्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा… अपघातात जीव सामान्य हिंदुस्थानींचा जातोय आणि सरकार मात्र श्रीमंतांच्या बुलेट ट्रेनच्या मागे आहे. आजच्या रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! ओम शांती! अशा भावना आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरून व्यक्त केल्या.

पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांनी अपघाताची जबाबदारी घ्यावी – खरगे

एनडीए सरकारने रेल्वेची सुरक्षा कशी धोक्यात आणली आहे, याचे उदाहरण म्हणजे हा अपघात. आज घडलेल्या रेल्वे अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एनडीए सरकारवर निशाणा साधला. मोदी आणि रेल्वे मंत्री प्रसिद्धीची एकही संधी सोडत नाहीत. आता अपघाताची जबाबदारी त्यांनी घ्यायला हवी. देशभरातील रेल्वे मार्गांवर टक्करविरोधी यंत्र आणि कवच बसवले जावे, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे, असेही खरगे यांनी स्पष्ट केले.

सरकारच्या दुर्लक्षामुळे अपघात -राहुल गांधी

सरकारच्या गैरव्यवस्थापन आणि दुर्लक्षामुळे सातत्याने रेल्वे अपघात घडत आहेत हे अत्यंत गंभीर आहे. काही दिवसांपूर्वी लोको पायलट्सोबत केलेली चर्चा आणि अलीकडेच घडलेले रेल्वे अपघात हेच दर्शवतात, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांथी यांनी याप्रकरणी एनडीए सरकारवर टीका केली आहे. प्रवाशांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद असून मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या सहवेदना आहेत. जखमी झालेल्यांची प्रकृती लवकरात लवकर उत्तम होवो हीच प्रार्थना, असे राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.