सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. कधी चित्रविचित्र फोटो, तर कधी अजबगजब व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. सध्याही असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या भागातील विद्यमान आमदाराला लग्नासाठी पोरगी शोधून देण्याची गळ घालताना दिसतोय.
देशाच सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभेनंतर हरयाणा, जम्मू-कश्मीरमच्या विधानसभा निवडणुका झाल्या. आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यानिमित्ताने नेतेमंडळींचे दौरेही सुरू असून याच दौऱ्यादरम्यान एक व्यक्ती आमदाराला चक्क लग्नासाठी पोरगी शोधून देण्याची गळ घालतो. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. सदर व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील महोबा येथील असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या आमदाराचे नाव डॉ. ब्रिजभूषण राजबूत आहेत. दौऱ्यादरम्यान ते चरखारी पेट्रोल पंपावर गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी पोहोचले. त्यावेळी तिथे काम करणारा एक कर्मचारी त्यांच्याजवळ आला आणि आपले लग्न लावून देण्याची मागणी करू लागला. साहेब, मी तुम्हाला मत दिले आहे. आता माझे लग्न लावून द्या, अशी गळ कर्मचारी घालतो.
अचानक झालेल्या या मागणीमध्ये आमदारही गांगरून जातात. त्यानंतर ते सदर कर्मचाऱ्याशी बोलून माहितीही घेतात. जे तुमच्या नशिबामध्ये आहे, ते तुम्हाला मिळेल. मी महादेवाकडे प्रार्थना करतो. मी पण प्रयत्न करेन, कारण तुम्ही मला मत दिले आहे, असे वचन आमदार कर्मचाऱ्याला देतात.
यादरम्यान आमदार सदर कर्मचाऱ्याचे उत्पन्नही विचारतात. मुलीच्या घरच्यांनी मुलगा काय करतो असे विचारले तर? तुम्ही किती कमावता? असा सवाल ते कर्मचाऱ्याला करतात. यावर कर्मचारी 6 हजार असे उत्तर देतो. विशेष म्हणजे आमदारानेही हा व्हिडीओ आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.