![Theft](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Theft-696x447.jpg)
उत्तर प्रदेशातील कन्नोज पोलिसांनी पंचांग पाहून मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. 9 आकडा लकी मानून ही टोळी देवाच्या दारात चोरी करत असे. फिरोजाबाद येथील टुंडला कोतवाली भागात माता वैष्णो देवी धाम मंदिरात चोरी झाली. या प्रकरणी पोलिसांनी चार चोरटय़ांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 682 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या सळ्या, मुपुटाचे तुकडे, पितळेची भांडी आणि 9,500 रुपये जप्त करण्यात आले. चोरटय़ांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला. त्यानंतर टुंडला आणि कन्नौज पोलिसांच्या संयुक्त कारवाईत फिरोजाबादमध्ये आरोपींचा शोध लागला.
चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितले की, चोरी करण्यापूर्वी रेकी केली जात होती. त्यानंतर मंदिरात सीसीटीव्ही पॅमेरे असल्याने डीव्हीआर काढून ठेवले जायचे. या धूर्त चोरांच्या टोळीचा अंकशास्त्रावर खूप विश्वास होता. मंदिरात दरोडा टाकण्यासाठी ही मंडळी 9 क्रमांकाचा दिवस निवडायची. म्हणून त्यांनी चोरीसाठी 29 जानेवारी 2024 हा दिवस निवडला होता. यापूर्वी त्यांनी 9 जानेवारी रोजी इटावा येथील साई मंदिरात डल्ला टाकला होता. कन्नौजचे पोलीस अधीक्षक विनोद पुमार म्हणाले की, आरोपी 9 क्रमांकावर विश्वास ठेवून गुन्हा करत असल्याची कबुली त्यांनी दिली.