मला त्याच्याशी लग्न करून संसार थाटायचाय, भावी जावयासोबत पळालेली सासू आली मघारी

उत्तर प्रदेशातील अलिगढमधील एक प्रेम कहाणी गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. येथील एक महिला आपल्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पळून गेली होती. मुलीच्या लग्नाला अवघे दहा दिवस बाकी असताना ही घटना घडली होती. जावयासोबतच सासू फरार झाल्यामुळे ही कहाणी चांगलीच व्हायरल झाली. आता या कहाणीत एक ट्वीस्ट आला असून मुलीच्या लग्नाच्याच दिवशी म्हणजे 10 दिवसांनी हे दोघेही परत आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी असे त्या मुलीचे नाव असून राहुल हे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे. तर सपना हे शिवानीच्या आईचे नाव आहे. शिवानी आणि राहुल या दोघांच्या लग्नाला अवघे 10 दिवस शिल्लक असतना शिवानीची आई सपना तिच्या जावयासोबत पळून गेली. आणि तब्बल 10 दिवसांनंतर हे दोघेही पोलिसांसमोर हजर झाले. यावेळी सपनाने आणि राहुलने पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

सपना आणि राहुल यांचे आधी मोबाईलवर संभाषण झालं. याचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. सपनाचा नवरा सतत दारू पिऊन तिला मारहाण करत होता. त्यामुळे ती हैराण झाली होती. आणि त्याच वेळी राहुल तिच्या आयुष्यात आला आणि त्याने तिला आधार दिला. यादरम्यान राहुल आणि शिवानीचे लग्न ठरले होते. घरात लगीनघाई सुरू होती. याचवेळी संधीचा फायदा घेत शिवानीची आई सपना राहुलसोबत पळून गेली. आणि 10 दिवसांनी पुन्हा आल्यावरही तिला राहुलसोबत संसार थाटायचा असल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. याचसोबत सपनाच्या मुलीने आणि कुंटुंबीयांनी तिच्यावर साडी तीन लाख रुपये आणि 5 लाखांचे दागिनेही घेऊन गेल्याचा आरोप केला होता. तोही तिने फेटाळला असून मी फक्त 200 रुपये आणि मोबाईल सोबत घेऊन गेल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

दरम्यान, सपना सोबतच राहुलनेही पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली. शिवानीच्या आईने म्हणजेच सपनाने जीव देण्याची धमकी दिल्याने मी हा निर्णय घेतला असल्याचे राहुलने पोलिसांना सांगितले. जर मी सपनाला अलिगढच्या बस स्थानकावर तिला भेटायला गेलो नाही तर ती जीव देईल, असे तिने सांगितले होते. त्यामुळे मी तिला भेटलो. तेथून आम्ही आधी लखनऊला गेलो आणि मग मिर्झापूरला गेलो. मात्र तेव्हा पोलीस आमच्या मागावर होते त्यामुळे आम्ही पुन्हा येण्याचा निर्णय घेतला, असे तो यावेळी म्हणाला. दरम्यान, आता पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून पुढील चौकशी सुरू केली आहे. तसेच शिवानीने तिच्या आईला सपनाला पुन्हा घरात घेण्यात नकार दिला आहे.