मागील दोन-तीन दिवसांपासून अरबी समुद्रातून प्रवाहित राहिलेल्या वाऱ्यांमुळे मुंबईच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री अचानक शहर व उपनगरांत अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. या अवकाळी पावसामुळे किमान तापमानात चार अंशांची वाढ झाली. दादर, भायखळा, लालबाग, परळ, वांद्रे, पवई, अंधेरी परिसरात पावसाचा शिडकावा झाला.
शहरात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर सूर्यदर्शनही झाले नव्हते. तसेच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यानंतर मध्यरात्री आणि शनिवारी पहाटेच्या सुमारास अनेक भागांत हलक्या पावसाची हजेरी लागली. या पावसामुळे थंडीची तीव्रता कमी झाली आणि सांताक्रुझमध्ये किमान तापमानात चार अंशांची वाढ होऊन ते 21 अंश इतके नोंद झाले. मात्र येत्या तीन-चार दिवसांत पुन्हा थंडीची तीव्रता वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.