अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानाचा फटका, उरणमधील रब्बी पिके डेंजर झोनमध्ये

आज पहाटे अवकाळी पावसाने उरण तालुक्यात हजेरी लावल्याने येथील हवामान अचानक बदलले आहे. कधी दमट तर कधी वाढती थंडी आणि ढगाळ वातावरण याचा मोठा फटका वाल, तूर, उडीद, मूग, चवळी, टोमॅटो, वांगी, भेंडी अशा पिकांना बसला आहे. बदलत्या हवामानामुळे उरणमधील रब्बी पिके डेंजर झोनमध्ये असून आंब्याचा मोहरदेखील गळून पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मोठ्या कष्टाने लावलेल्या भाज्या व अन्य पिके याचे नुकसान झाले तर ते कोण भरून देणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

उरण परिसरातील चिरनेर, पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोन, पाले, गोवठणे, आवरे, पानदिवे, कोप्रोली, कळंबुसरे, चिरनेर, कंठवली, भोम, रानसई, वेश्वी, विंधणे, दिघोडे, केगाव, नागाव परिसरातील शेतकरी भाजीपाला पिके घेतात, तर शेकडो शेतकरी आंबा उत्पादक आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकरी शेवग्याची लागवड करतात. नुकताच आंब्याला मोहर व शेवग्याला फुले येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सातत्याने बदलत असलेले वातावरण आणि शनिवारी पहाटे कोसळलेल्या अवकाळी पावसाने आंब्याला लागलेला मोहर आणि शेवग्याची फुले गळून पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

■ काही दिवसांपासून सातत्याने बदलत चाललेले खराब हवामान आणि शनिवारी पहाटे कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकेदेखील धोक्यात आली आहेत.

■ आंबा मोहर आणि शेवग्याची फुलेही गळून पडू लागली आहेत. यानंतरही आणखी पाऊस पडला तर पिकांमध्ये कीड पडण्याची भीती येथील शेतकरी सुरेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश

आणखी अवकाळी पाऊस पडला तर आंबा मोहर, शेवग्याची फुले गळून जाण्याची शक्यता आहे. अन्य पिकांची पाहणी करून नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांनी दिली.