लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, फळांसह पालेभाज्यांचे नुकसान

शहरासह जिल्ह्यात आज सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. हलक्या स्वरुपात गारांचा पाऊस ही झाला.

लातूर शहरात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. लातूर शहर परिसरासह जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे. हलक्या स्वरूपात गारांचा पाऊस झाला. अहमदपूर तालुक्यातील मौजे किनगाव परिसरातही मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने गुरुवारी साडे चारच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचे आगमन झाले. विद्युत पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे आंबा फळासह पालेभाज्यांचे सुद्धा अतोनात नुकसान झाले आहे.

त्यामुळे बाजारात भाजीपाला महाग होण्याची शक्यता जाणकार भाजीपाला व्यापाऱ्याकडून वर्तवली जात आहे. किनगाव आणि परिसरात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात होती. या पावसाने रब्बी पिकासह पालेभाज्या फूलकोबी, टमाटे, वांगे, मेथी, कांदा, भेंडी, दोडका, मटकी सह फुलांचे सुद्धा नुकसान झाले आहे. त्यामुळे ती बाजारात महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे जोराचे वादळ व पावसाने आंबा झाडांची फळे गळून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दुपारनंतर कधी सौम्य तर कधी जोरदार वाऱ्याच्या लाटा निर्माण झाल्या होत्या. विजांच्या गडगडाटाने जनावरांच्या खाद्यासाठीची वैरण, गुळी ,भुईमुगाच्या वेली यावर झाकण्यासाठी बाजारात मेन कापड खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ मोठया प्रमाणात होताना दिसून आली. निलंगा शहर आणि परिसरात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. जळकोट तालुक्यात पावसाने हजेरी लावली. अहमदपूर तालुक्यातील हडोळती परिसरात वीजांचा कडकडाट सुरू होता. आभाळ भरून आले होते.