Mumbai Rain – हिवाळ्यात पावसाची रिप रिप, रस्त्यावर चिप चिप; नागरिकांची उडाली तारांबळ

mumbai-rain
फोटो - गणेश पुराणिक

मुंबईत गेल्या आठवड्यात पारा घसरल्यानंतर थंडीची चाहूल लागली होती. मुंबईकरांनी पहाटेच्या वेळात स्वेटर परिधान करण्यास सुरुवात केली होती. आज मात्र उलटच घडले. रात्रीपासूनच ढग जमले होते आणि पहाटेच शहर आणि उपनगरातील काही भागात पावसाची रिप रिप सुरू झाली. हिवाळ्यात पावसाच्या आगमनाने मुंबईकर गोंधळले. पावसामुळे रस्त्यांवरील धूळ ओली होऊन चिप चिप झाल्याचं पाहायला मिळाले. यामुळे चिखलाचे डाग उडू नये, पाय घसरू नये अशा विचारात पायी चालणाऱ्या नोकरदारवर्गाचा वेग मंदावला. अनेकांना आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यास उशीर होत असल्याचे चित्र सकाळी दिसत आहे.

तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळाने हाहाःकार माजवला आहे. फेंगल चक्रीवादळामुळे कोकणातील हवामानातही बदल झाला असून मंगळवारी रत्नागिरीत दिवसभर ढगाळ वातावरण होते. चक्रीवादळाचा कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रातून ओमानच्या दिशेने सरकत असून पुढील 2-3 दिवस हवामान ढगाळ राहणार आहे. यामुळे कोकणात काही ठिकाणी हलका ते मध्यम पर्जन्यमान होण्याची शक्यता हवामान विभागाकडून आधीच वर्तविण्यात आलेली होती. तर मध्य महाराष्ट्रातही तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता असल्याचे यात सांगण्यात आले आहे.

फोटो – गणेश पुराणिक

हा अंदाज आज खरा ठरला. दक्षिण हिंदुस्थानमध्ये धडकलेल्या फेंगल चक्रि‍वादळाचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसू लागला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमधील थंडी गायब झाली असून आकाशात ढगांची गर्दी झाली आहे. त्यामुळे उकाडा प्रचंड वाढला असून बुधवारी सकाळी मुंबईतील काही भागांमध्ये अवकाळी पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. त्यामुळे ऐन थंडीमध्ये लोकांना स्वेटर ऐवजी छत्री बाहेर काढावी लागली.

सकाळच्या सुमारास कामावर निघालेल्या चाकरमान्यांची अचानक सुरू झालेल्या पावसांच्या सरींमुळे चांगलीच तारांबळ उडाली. पावसांच्या हलक्या सरींमुळे नागरिकांनी दुकाने, फ्लायओव्हरखाली आसरा घेतला. काहींनी डोक्यावर रुमाल, प्लास्टिकची पिशवी टाकून कामावर पोहोचण्यासाठी धाव घेतली. मात्र रस्त्यावर चिप चिप झाल्याने पाय घसरत होते, त्यामुळे चाकरमान्यांचा वेग मंदावला.

फोटो – गणेश पुराणिक

तापमानात वाढ

चक्रि‍वादळामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात दमटपणा वाढला आहे. पहाटेच्या सुमारास जाणवणारी थंडीही गायब झाली आहे. किमान आणि कमाल तापमानातही वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील दुपारचे तापमान कमाल 28, तर किमान 12 -14 पर्यंत पोहोचले आहे.