मुंबई विद्यापीठाच्या दहा सिनेटसाठी आज विद्यापीठ परीक्षेत्रात एकूण 38 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी 13 हजार 406 पदवीधरांनी मतदानासाठी नोंदणी केली होती. मात्र सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण सुमारे 55 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीतून ‘मिंधे’, ‘मनसे’ने माघार घेतली असून शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेचे 10 शिलेदार मैदानात आहेत. शुक्रवार, 27 सप्टेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या दहा पदवीधर नोंदणीकृत सिनेटची मुदत ऑगस्ट 2022 मध्ये संपली. त्यामुळे ही मुदत संपण्याआधी निवडणूक घेऊन अधिसभा स्थापन होणे गरजेचे होते. मात्र राज्यात गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करून सत्तेत आलेल्या मिंधे-भाजप सरकारने पराभवाच्या भीतीमुळे सिनेट निवडणूक घेण्याचे धाडस केले नाही. कारण याआधी झालेल्या सर्व निवडणुकीत मिंधे-भाजपला सपाटून मार खावा लागला होता. विशेष म्हणजे दोन वर्षांनंतर 21 सप्टेंबर रोजी होणारी निवडणूकही विद्यापीठाने मिंध्यांच्या दबावामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने मिंधे आणि भाजपला चपराक लगावल्याने अखेर आज निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली.
युवासेनेचे दहा शिलेदार मैदानात
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी युवासेनेकडून खुल्या प्रवर्गासाठी प्रदीप सावंत, अॅड. अल्पेश भोईर, मिलिंद साटम, परमात्मा यादव, किसन सावंत तर इतर मागास प्रवर्गातून मयूर पांचाळ, महिला प्रवर्ग-स्नेहा गवळी, अनुसूचित जाती-शीतल शेठ-देवरुखकर, अनुसूचित जाती जमाती – डॉ. धनराज कोहचाडे आणि विज-भज प्रवर्गासाठी शशिकांत झोरे हे मैदानात आहेत.
युवासेनेचे पारडे जड
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत गेल्या काही वर्षांत युवासेनेचेच वर्चस्व राहिले आहे. गेल्या निवडणुकीत तर सर्व दहा जागा युवासेनेने जिंकल्या होत्या. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेला मिळालेला प्रचंड आणि उत्स्फूर्त पाठिंबा पाहता यावेळीही युवा सेना सर्वच्या सर्व दहा जागा जिंकेल असे बोलले जात आहे.