मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसची दुरवस्था; युवा सेना माजी सिनेट सदस्यांनी केली पाहणी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत मुंबई विद्यापीठ कलिना पॅम्पसच्या दुर्दशेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदनात समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे युवासेना माजी सिनेट सदस्यांनी कलिना पॅम्पसमधील दुरावस्थेची पाहणी केली.

पॅम्पसमधील तरणतलाव आणि विद्यापीठाच्या दहा गाडय़ा न वापरल्यामुळे भंगारात जाण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांच्या फीद्वारे जमा झालेल्या निधीतून गाडय़ा खरेदी करून पैशाचा अपव्यय केल्याचा आरोप युवा सेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी केला आहे. तसेच एक गाडी गॅरेजमध्ये दुरुस्तीकरिता गेली तीसुद्धा परत आलेली नाही. शिवाय मोठा गाजावाजा करून फिरते वाचनालय सुरू करण्यात आले त्या गाडीचा थांगपत्ता नाही. या सर्व प्रकरणाची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेऊन कलिना पॅम्पस विद्यापीठाची दुर्दशा पाहून उपाययोजना करावी, अशी मागणी युवा सेनेने केली आहे.