बोगस कॉलसेंटर थाटून अमेरिकन नागरिकांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनविना सेक्सवर्धक औषधे विकण्याचा विक्रोळी येथे सुरू असलेला काळाबाजार गुन्हे शाखेच्या युनिट-10 ने उद्ध्वस्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली असून विविध साहित्य हस्तगत केले आहे.
विक्रोळी पश्चिमेकडील पार्कसाईट पोलीस ठाण्यातच्या हद्दीत असलेल्या कैलास इंडस्ट्रिअलमध्ये बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई यांना मिळाली. माहिती आवश्यक खातरजमा केल्यानंतर महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक दीपक सावंत, निरीक्षक सुतार, सपोनि चौधरी, तोडकर तसेच कांबळे, जगताप, निर्मळे, महिला अंमलदार सोनावणे, चव्हाण या पथकाने त्या कॉल सेंटरवर धडक दिली. त्यावेळी तेथे बरेच तरुण व्हीसी डायलरचा वापर करून व्हीओ आयपी कॉलद्वारे अमेरिकन नागरिकांना संपर्क साधून त्यांना व्हायग्रा व सिऑलिस ही शक्तिवर्धक औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनविना बेकायदेशीरपणे विकत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारे ते नागरिक व शासनाची फसवणूक करीत होते. त्यामुळे हे बोगस कॉल सेंटर थाटणाऱया रितेश शेट्टी (28) आणि सुमित जाधव (30) या दोघांसह आठ कॉलर्सना अटक केली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी चार हार्डडिस्क, तीन मोबाईल, राऊटर, संगणकातील माहिती हस्तगत केली आहे.