
फ्रान्सच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक वारशाचे प्रतीक असलेल्या दुर्मिळ फ्रेंच चलनी नोटा पाहण्याची अनोखी संधी मुंबईकरांना मिळाली आहे. फ्रेंच चलनी नोटा या फ्रान्सच्या प्राचीन कलेचा उत्तम नमुना मानल्या जातात. प्रदर्शनाच्या माध्यमातून ही अनोखी कला जाणून घेता येईल. प्रसिद्ध संशोधक आणि चलनी नोट संकलक रुक्मिणी डहाणूकर यांची संकल्पना असलेले प्रदर्शन नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये 24 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहील.
फ्रेंच नोटांवर फ्रान्सच्या प्रसिद्ध इतिहासकार, कलाकार, वैज्ञानिक आणि वास्तुशास्त्रातील अनेक वैशिष्ट्ये आढळतात. फ्रेंचच्या नोटांची छपाई अत्यंत सूक्ष्म आणि कलात्मकतेने केली जाते. त्यामुळेच फ्रेंच चलनी नोटांना आर्थिक व्यवहारापलीकडे अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. प्रदर्शनात मोठ्या आकारातील कॅनव्हासवरील नोटांच्या प्रतिकृती तसेच मूळ आकारातील प्रिंट्स पाहता येतील. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि अलियांस फ्रांसेस द बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बियॉण्ड फेस व्हेल्यू’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.