Dating Trends- लग्नाआधीच्या डेटिंगचा अनोखा फंडा! तू मी आणि पेट्स

एक काळ होता जिथे लग्नाआधी एकमेकांना भेटून एकमेकांच्या आवडी-निवडी जाणून घेतल्या जायच्या. आवडी निवडी जुळल्यावर मग, लग्नाची तारीख ठरायची. पण आता काळ बदलला, कपल्सच्या आवडी-निवडीमध्ये सध्याच्या घडीला पाळीव प्राणी फार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

आजकाल डेटिंग ट्रेंड हा खूप बदलत चाललेला दिसत आहे. आता फक्त कपल्सची एकमेकांची पसंती ही गरजेची नाही. तर जोडीदारासोबत त्याच्याकडे असलेला पाळीव प्राणीसुद्धा महत्त्वाचा ठरत आहे.

एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे पाळीव प्राण्याबद्दलचे प्रेम किती आहे यावर सध्या अनेक गोष्टी अवलंबून आहेत. तुझ्याकडे कोणता कुत्रा आहे कोणते ब्रीड आहे यावर आता लग्नाची बोलणी पुढे होत आहेत. कुत्रा असणारे मालक हे आपल्यासमोरच्या जोडीदाराकडेही कुत्राच असायला हवा आणि तोही सारख्या जातीचा. त्यामुळेच सध्याचा हा बदलता ट्रेंड अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. त्यामुळेच सध्या पाळीव प्राणी आता डेटिंगचा एक मोठा भाग आहेत. गोल्डन रिट्रीव्हरवरील प्रेमामुळे एकमेकांशी जोडले जात आहेत. तर दुसरीकडे मांजर प्रेमी देखील एकमेकांसोबत डेटवर जात आहेत.

 

टिंडर इंडियाच्या डेटानुसार जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान, “तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का?” असे विचारणाऱ्या प्रोफाइलमध्ये 7.6 टक्के वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पसंती ही श्वानप्रेमींना मिळत आहे. त्यानंतर मांजरप्रेमींचा नंबर लागतो. ज्यांच्याकडे पाळीव प्राणी नाहीत पण ते त्यांच्यावर प्रेम करतात ते देखील त्यांच्या डेटिंग प्रोफाइलमध्ये हे स्पष्ट करत आहेत.

पाळीव प्राणी असणे आता डेटिंगसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. अनेकदा मॅट्रीमोनिअल साईटस् वर प्रोफाईलमध्ये पाळीव प्राणी बघून पुढे चॅटिंगला सुरुवात करण्यात येते असेही दिसून आले आहे. काही जोडपी केवळ प्राण्यांवरील त्यांच्या सामायिक प्रेमामुळेच एकमेकांशी जोडली गेलेली आहेत.