‘प्रत्येक घरात पाणी पोहोचविण्यासाठी केंद्र शासन ‘हर घर जल’ राबवीत आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे आवश्यक आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी, यासाठी पुढील दोन महिन्यांत देशातील 20 नद्या एकमेकींशी जोडण्यात येणार आहेत,’ असे केंद्रीय जलसंसाधनमंत्री सी. आर. पाटील यांनी सांगितले.
गणेश कला-क्रीडा मंच येथे ‘नाम फाउंडेशन’च्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, सुरतच्या आमदार संगीता पाटील, ‘नाम’चे अध्यक्ष नाना पाटेकर, संस्थापक मकरंद अनासपुरे उपस्थित होते. केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले, “हर घर जल योजनेमुळे महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली. जलसंधारणाच्या अनेक योजनांना गती देण्यात येत आहे. यामध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगला प्राधान्य दिले आहे. जगाच्या 18 टक्के लोकसंख्या भारतात आहे. या तुलनेत स्वच्छ व पिण्यालायक पाणी केवळ 4 टक्के उपलब्ध आहे.
भविष्यात देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी, यासाठी पुढील दोन महिन्यांत देशातील 20 नद्या एकमेकींशी जोडण्याचे काम करण्यात येईल.’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जलयुक्त शिवार’ योजना यशस्वी करण्यामध्ये ‘नाम फाऊंडेशन’चा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील पाणी समस्येवरील उपाय शोधण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ कार्यक्रमाची शासनाने आखणी केली. या कार्यक्रमाला नाम फाऊंडेशनने लोकचळवळीत रूपांतरित केले. नाम फाऊंडेशनचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे,’ असे गौदवोद्गार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काढले.
आयुष्यात कधीच राजकारणात नाही !
कार्यक्रमानंतर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्यभरात ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून केलेल्या कामांचा आढावा घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून नाना पाटेकर यांचे नाव चर्चेत आहे. यासंबंधी प्रश्नावर नाना पाटेकर यांनी स्पष्टीकरण दिले. ‘हा माझा किंवा आमचा कोणाचाच पिंड नाही. मी आयुष्यात कधीच राजकारणात नाही; पण त्यांच्याशी (राजकारण्यांशी) मैत्री करणार. सगळेच चांगले आहेत असेदेखील नाही आणि सगळेच वाईट आहेत असेदेखील नाही. राजकारणात खूप चांगलीदेखील मंडळी आहेत,’ असेही नाना पाटेकर म्हणाले. ‘राजकारणात न जाण्याचे नेमके कारण सांगायचे झाल्यास, मला पटले नाही, तर मी पटकन बोलतो. त्यामुळे मला पटकन काढतील ना। गप्प राहिले पाहिजे, हे शिकता आले पाहिजे,’ अशी भूमिकाही त्यांनी मांडली.