मीराबद्दल वादग्रस्त विधान, कायदा मंत्री मेघवाल यांनी मागितली जाहीर माफी

केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी मीराबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून अखेर माफी मागितली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. एका कार्यक्रमात बोलताना मेघवाल यांनी मीराचा पती नव्हे तर दिराने छळ केला असल्याचे म्हटले होते. यावरून राजपूत समाजाने आक्षेप घेत प्रचंड संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले गेले. माफी न मागितल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

वाढता वाद पाहता ‘एक्स’वर एक व्हिडीओ शेअर करत मेघवाल यांनी कोणाचे मन दुखावले असेल तर माफी मागतो असे म्हटले. हिंदुस्थानच्या भक्ती परंपरेत मीराचे स्थान शिरोमणीचे आहे. मीरावर माझी अपार श्रद्धा आहे. माझ्या विधानामुळे आई मीराविषयी भक्ती आणि आदर असलेल्यांची मने दुखावल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो व माफी मागतो, असे मेघवाल यांनी नमूद केले. मेघवाल हे राजस्थानमधील बिकानेरचे खासदार आहेत.